सुधीर लंके -अहमदनगर : मी राजीनामा दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली असली तरी ती चुकीची आहे. मी त्यांना असे बोललो नाही. माझ्या भावना मी पक्षश्रेष्ठींना कळविल्याचे त्यांना सांगितले, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी लोकमतशी बोलताना दिली.काँग्रेसमध्ये जे राजकारण झाले त्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे माझ्या भावना मी मांडल्या आहेत. विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे कसे कठीण झाले आहे, हे आपण पत्रात लिहिल्याचे थोरात यांनी सांगितले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये जे राजकारण झालेे त्यावरून व्यथित होत थोरात यांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या मंगळवारी प्रसारित झाल्या. त्यामुळे काँग्रेससह आघाडीत खळबळ उडाली.याबाबत थोरात यांच्याशी संपर्क करून राजीनाम्याच्या चर्चेबाबत त्यांना विचारले असता ‘राजीनामा नव्हे, मी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे’ एवढेच ते म्हणाले. तक्रारीत सर्व म्हणणे व भावना मांडल्याचे सांगत या विषयावर बोलणे त्यांनी टाळले. ‘लोक अनेक अर्थ काढत असतात’, असेही ते म्हणाले.
भावना केल्या व्यक्तथोरात यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी राजीनामा दिलेला नाही. मात्र, सध्याच्या परिस्थितीत काम करणे अवघड जात आहे, अशा प्रकारच्या भावना त्यांनी पक्षश्रेष्ठींना पाठविलेल्या पत्रात मांडल्या आहेत.