मुंबई : मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात बुधवारी अज्ञात व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. शेलार यांनी पत्नी आणि स्वीय साहाय्यकाच्या नावे बेहिशेबी मालमत्ता जमविली असून, निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या मालमत्तेबाबतची माहिती दडविण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ‘एक भारतीय’ या नावाने एका व्यक्तीने आशिष शेलार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. शेलार हे सत्ताधारी पक्षातील वजनदार नेते असून, ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे आपले नाव गुप्त ठेवल्याचा दावा करीत तक्रारदाराने शेलार यांनी बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप केला आहे. रिद्धी डेलमार्क प्रायव्हेट लिमिटेड (कोलकाता), ओपेरा रिएलटर्स प्रा. लि. (मुंबई), सर्वेश्वर लॉजिस्टिक सर्व्हिसेस प्रा. लि. (बेलापूर), आल्हाद प्रापर्टीज् प्रा. लि. या कंपन्यांची माहिती दडविण्यात आली असून, खार भागात ‘गार्डन होम्स्’ नावाने दोन बंगल्यांची खरेदी केल्याचा शेलार यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. आशिष शेलार यांनी मात्र बेहिशेबी मालमत्तेचे सर्व आरोप फेटाळले आहेत. लाचलुचपत विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारीत तक्रारदाराने दिलेली माहिती चुकीची व अर्धवट असल्याचा दावा केला आहे. ‘माझा कोणताही बेकायदेशीर व्यवसाय नाही. मी जो व्यवसाय करतो त्याचा आयकर भरतो. त्याबाबची सविस्तर माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रातही दिलेली आहे,’ असा खुलासा शेलार यांनी केला. सर्वेश्वर लॉजिस्टिक सर्व्हिसेस या कंपनीचा मी संचालक असून, वकिलीतून आलेले पैसे यात गुंतवलेले आहेत. माझा तो अधिकृत व्यवसाय आहे. या कंपनीवर ६ कोटींचे कर्ज आहे. या कंपनीचा आयकर भरतो. तर, रिद्धि डेलमार्क प्रा. लि. आणि ओपेरा रिएलटर्स या कंपन्या माझ्या नावे असल्या तरी या कंपन्यांच्या नावे कुठलाही व्यवहार झालेला नाही तसेच या कंपन्यांची कोणतीही स्थावर - जंगम मालमत्ताही नाही. त्याची माहितीदेखील निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे, असे शेलार यांनी सांगितले. याशिवाय आल्हाद कंपनीशी माझा कोणताही संबंध नाही. तसेच सुनील परब आणि प्रकाश पाटील हे माझे पीए नसून भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्याचप्रमाणे तक्रारदाराने नमूद केलेले बंगले अथवा गाळे माझे नाहीत. अन्य कुठल्याही ठिकाणी माझी गुंतवणूक नाही अथवा माझे व्यावसायिक संबंध नाहीत, असे शेलार यांनी स्पष्ट केले.
आशिष शेलार यांच्याविरोधात तक्रार
By admin | Published: January 08, 2016 2:45 AM