मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेसची आचारसंहिता भंगाची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 09:17 AM2018-05-24T09:17:28+5:302018-05-24T09:17:28+5:30
भारतीय जनता पक्षातर्फे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ता, पैसा, धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केल्याचा आरोप करून, मुख्यमंत्र्यांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे बुधवारी केली आहे.
- हितेन नाईक
पालघर : भारतीय जनता पक्षातर्फे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ता, पैसा, धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केल्याचा आरोप करून, मुख्यमंत्र्यांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे बुधवारी केली आहे.
काँग्रेस शिष्टमंडळाने बुधवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही तक्रार केली. या संदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेला खोटी आश्वासने देऊन, आमिषे दाखवून आणि निर्णय घोषित करून पदाचा दुरुपयोग व आदर्श आचारसंहितेचा भंग करीत आहेत. कल्याण डोंबिवली महानगपालिका व पेण नगरपालिका निवडणुकीत त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, परंतु दुर्दैवाने त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही. २० मे रोजी मुख्यमंत्र्यांनी पालघर लोकसभा क्षेत्रात भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभांमध्ये खावटी कर्ज माफ करू, पालघरला वैद्यकीय महाविद्यालय उभारू, वसई विरार महापालिका क्षेत्रातून २९ गावे वगळू, अशा घोषणा केल्या. त्यावर निवडणूक आयोगाने याची स्वत: दखल घेऊन कारवाई करणे अपेक्षित होते, परंतु आयोगाने कारवाई न केल्याने नाईलाजाने काँग्रेस पक्षाला तक्रार करावी लागली, असे सांगून निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली चालतो का? असा प्रश्न जनमानसाच्या मनात उपस्थित होत असल्याचे सावंत यांनी सांगितले.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे सत्ता व पैशाचा प्रचंड गैरवापर सुरू असून, पोलीस व महसूल अधिकारी यांचा वापर प्रचारांच्या कामासाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांनी पालघर लोकसभा क्षेत्रात अतिवरिष्ठ पोलीस अधिकारी व महसूल अधिकारी हॉटेलात मुक्कामी राहून काय करत आहेत? पालघरमधील क्लब वन व इम्पिरीयल या दोन्ही हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करावी, अशी मागणी सावंत यांनी या वेळी केली. भाजपाने आपल्या प्रचारासाठी एका मोठ्या बिल्डर नेत्याशी संबंधित मुंबई-अहमदाबाद मार्गावरील एका धर्मस्थळाचा बॅक आॅफिससाठी उपयोग केला जात आहे का? याबाबत भाजपाने स्पष्टीकरण द्यावे, अशीही मागणी करण्यात आलेली आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे आपला मतदार संघही वाचविता न आलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयकुमार बिष्ट (आदित्यनाथ) यांना, केवळ धार्मिक ध्रुवीकरण करण्याकरिता पाचारण केले जात असून, सदरचा नेता हा ‘योगी नसून ढोंगी’ असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवून, त्या जागी मनुवादी विचारांच्या दीनदयाळ उपाध्याय यांचा पुतळा का उभारला? याचे उत्तर देशाच्या जनतेला त्यांनी द्यावे, असे सावंत म्हणाले.
हे तर गुजरातचे एजंट
भाजपा व शिवसेना हे दोन्ही पक्ष भ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तीचे प्रतीक असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या हिताला तिलांजली देऊन, गुजरातचे हित साधण्याकरिता नियुक्त केलेले एजंट म्हणून काम करीत आहेत. गुजरातच्या विकासाला चालना देणारी बुलेट ट्रेन थांबविण्याची हिंमत शिवसेनेकडे आहे का? असा सवाल करून पालघरच्या हक्काचे पाणी गुजरातला वळविले, पालघरमध्ये होणारे सागरी पोलीस प्रशिक्षण केंद्र गुजरातने पळविल्यानंतरही शिवसेना सत्तेला चिकटून बसली आहे. या निवडणुकीतून भाजपा सेनेच्या भ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तीच्या अंताची सुरु वात होईल, असे सावंत म्हणाले.