मुंबई - राज्याचे दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांचे मंत्रिपद रद्द करण्याची तक्रार राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी आणि धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे शनिवारी केली आहे. रासपचे अध्यक्ष असताना भाजपाच्या चिन्हावर विधान परिषद जिंकून भाजपाच्या कोट्यातील मंत्री पद स्विकारल्याबद्दल जानकर यांविरोधात पक्षविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी तक्रारीत केली आहे.
पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले कि, अशाप्रकारे एका पक्षाचे सदस्य असताना संबंधित पक्षाचा राजीनामा दिल्याशिवाय दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढता येत नाही. रासप च्या घटनेतही तशी तरतूद आहे. मात्र जानकर स्वतः रासपचे अध्यक्ष असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यास कुणीही धजावत नाही.
म्हणूनच मी निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. प्रशासन याप्रकरणी काय कारवाई करते, हे पाहून अशाप्रकारे मंत्रीपदे व आमदारकी, खासदारकी मिळवणाऱ्या नेत्यांविरोधात तक्रार करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.