दोंडाईचा (धुळे) : विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल करून तथ्यहीन व खोटे आरोप करून राजकीय व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मालिक यांच्या विरोधात दोंडाईचा पोलिसात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल झाला आहे. रोजगार हमी व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी याबाबत तक्रार दिली होती. याशिवाय न्यायालयातही स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली आहे.दोंडाईचा येथे मंगळवारी अॅड. एकनाथ भावसार यांच्यामार्फत मंत्री रावल यांनी दोंडाईचा न्यायालय व पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नवाब मलिक यांनी धर्मा पाटील यांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल करीत आपली वृत्तवाहिन्यांवर बदनामी केली. तसेच जमीन बळकावल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. या प्रकारणात आपली नाहक बदनामी झाली असून, नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रावल यांनी या तक्रारीत केली आहे.दोंडाईचा येथील कत्तलखान्यास विरोध केला म्हणून मलिक खोटे आरोप करत असल्याचे रावल यांचे म्हणणे आहे.न्यायालयाच्या आदेशाने गुन्हायाप्रकरणी नवाब मलिक यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर याप्रकरणी चौकशी सुरु करण्यात येईल, अशी माहिती शिरपूर उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा, जयकुमार रावल यांची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 4:39 AM