पनवेल : खांदा वसाहतीतील न्यू हॉरिझोन शाळेत एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमानुसार पुस्तके न देता खासगी प्रकाशनाची जास्त किमतीची पुस्तके घेण्याची सक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे पालकांनी शाळेविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.न्यू हॉरिझोन शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याचाच फायदा घेत शाळा प्रशासन विद्यार्थ्यांचे गणवेष व पुस्तके बाहेरून विकत न घेता शाळेतूनच विकत घेण्याची सक्ती करण्यात येत आहे. बाजारात उपलब्ध किमतीपेक्षा शाळेत मिळणाऱ्या गणवेषाची किंमत जवळपास दुप्पट असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. गणवेषासोबत वह्या, पुस्तके, ग्राफ पेपर, कव्हर आदी स्टेशनरी सामान घेण्याची सक्तीही शाळा प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र या वस्तूंच्या किमती अव्वाच्या सव्वा लावण्यात येतात. वास्तविक पाहता, शाळेकडून एखादे प्रकाशन अथवा दुकानदारास ठेका दिल्यावर या वस्तू सवलतीच्या दरात मिळणे अपेक्षित असते. मात्र शाळा व्यवस्थापनाला मोठे कमिशन मिळत असल्याने आमच्या खिशाला कात्री लावण्यात येत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. सोमवारपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. मात्र तरीही काही विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध न झाल्याने मंगळवारी पालकांनी एकत्रित जमून शाळेविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (वार्ताहर)शाळेतर्फे दरवर्षी शैक्षणिक सहलींचे, तसेच शिबिरांचे आयोजन करण्यात येते. मात्र या वेळी शाळा कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नसते आणि तशा स्वरूपाचे अर्ज पालकांकडून भरून घेतले जातात.
न्यू हॉरिझोन शाळेविरोधात तक्रार
By admin | Published: April 05, 2017 2:56 AM