पुणे : मर्जीतील ठेकेदारालाच काम द्यावे, यासाठी दबाव आणला असल्याची तक्रार स्थायी समितीच्या अध्यक्षांविरोधात महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या व्यवस्थापकांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. विद्यार्थ्यांसाठीचा जेवण तयार करण्याचा हा ठेका होता. समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी यात काहीही तथ्य नसल्याचा खुलासा केला असून, कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले.वसतिगृहाचे व्यवस्थापक सोमनाथ बनकर यांनी ही तक्रार केली आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्याना दररोज जेवण देण्यासंदर्भात महापालिकेने निविदा जाहीर केली होती. त्यासाठी आलेल्या निविदांमध्ये सर्वाधिक कमी किमतीची निविदा प्रत्येक विद्यार्थ्यामागे दरमहा २ हजार २९० रुपये दराची होती. दुसरी एक निविदा ४ हजार रुपये दराची होती. नियमाप्रमाणे २ हजार २९० रुपये दराच्या निविदेचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवायला हवा होता, मात्र समितीचे अध्यक्ष बोडके ४ हजार रुपये असलेली निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवा म्हणून आग्रह करीत होते, असे बनकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. बोडके यांनी दबाव आणला, त्रास देण्याची धमकी दिली, असे बनकर यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) >बोडके यांना याबाबत विचारले असता त्यांनी बनकर यांना आपण ओळखतो, मात्र त्यांच्याशी या विषयावर काहीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. हा विषय स्थायी समितीत आल्यानंतरच समजले. राजू पवार व डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दरमहा २ हजार २९० रुपये म्हणजे दररोज १०० रुपये असा दर येतो. इतक्या कमी रकमेत विद्यार्थ्यांना चहा, नाष्टा, जेवण दिले तर त्याचा दर्जा खराब असणार, अशी शंका व्यक्त केल्याने आयुक्त कुणाल कुमार यांनी चौकशी करू, असे सांगितले. त्यामुळे हा विषय पुढच्या सभेत घेण्याचे ठरले, अशी माहिती बोडके यांनी दिली.
स्थायीच्या अध्यक्षांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
By admin | Published: May 19, 2016 1:19 AM