ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १६ - मोबाईलच्या नावाखाली दगड दिल्याने आॅनलाईन प्रॉडक्ट विकणा-या स्नॅपडील कंपनीच्या अधिका-यांसह ५ जणांविरुद्ध एका वकिलाने फसवणूकीची तक्रार नोंदवली. अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
अॅड. अंकुर रमाकांत कपले (वय २५, रा. अभ्यंकरनगर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी ९ आॅगस्टला ९२४५ रुपयांचा मोबाईल विकत घेण्यासाठी आॅर्डर नोंदविला. १४ आॅगस्टला ५.१५ वाजता त्यांना कुरियर बॉयने मोबाईल आॅर्डरचे पार्सल आणून दिले. त्याच्या हातात ९२४५ रुपये देऊन पार्सल घेतल्यानंतर काही वेळाने कपले यांनी एक्सप्रेस डिलेवरी एन जी हॅटीनेस असे इंग्रजीत लिहिलेले पार्सल उघडले. त्यात मोबाईल ऐवजी सिमेंटचा दगड आढळला. याबाबत त्यांनी कुरियर बॉयसह विविध संबंधित व्यक्तींकडे संपर्क साधला. मात्र, त्यांनी दाद दिली नाही. परिणामी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अॅड. कपले यांनी अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली.
तक्रारीत दिलेल्या मजकुरानुसार, पोलिसांनी कुणाल भाई (चिफ अॅक्झेकेटीव्ह आॅफिसर स्नॅपडील मुख्यालय, पहिला माळा, इंडस्ट्रीयल एरीया, न्यू दिल्ली), मॅनेजर रिजनल (स्नॅपडील आॅफीस, ३०१, तिसरा माळा, इंटरफेस बिल्डींग, १६ माईन स्पेस मलाड, मुंबई), व्ही. एस. डिस्ट्रीब्युटर (दुसरा माळा , आशिर्वाद कॉम्पलेक्स, उस्मानपुरा, अहमदाबाद) अमित तावा शहा (चिफ अॅक्झीकेटीव्ह आफीसर, प्रेस हेड आफीस, चौथा माळा, राजश्री बिजनेस पार्क लालीपाडा रोड, पुणे) आणि मॅनेजर प्रेस कोरीयर मोहननगर, नागपूर)आदींनी आपल्याकडून रक्कम घेऊन आपली फसवणूक केल्याचा आरोप अॅड. कपले यांनी केला. या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी उपरोक्त व्यक्तींविरूध्द गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.