अलर्ट सिटिजन ऑफ ठाणे सिटीची आयुक्तांकडे धावठाणे : स्थायी समिती सभापतीपदी विराजमान झालेल्या मनसेच्या सुधाकर चव्हाण यांच्या विरोधात अलर्ट सिटीजन ऑफ ठाणे सिटी या संस्थेने आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यांना न्यायालयाने तीन वर्षाची शिक्षा सुनावली असतांना सुध्दा त्यांना हे पद कसे दिले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला असून या बाबतीचा विचार करायला हवा होता, अशी मागणी केली आहे. मागील वर्षी ठाणे न्यायालयाने सुधाकर चव्हाण यांच्यासह अन्य ६ जणांना ठाणे परिवहनमधील घोटाळ्यासंदर्भात तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. परंतु चव्हाण यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात अपील केले असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान अलर्ट सिटीजन ऑफ ठाणे सिटी संस्थेचे गजानन नेने यांनी केलेल्या अर्जामुळे आता चव्हाण पुन्हा अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.या संदर्भात चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणात सध्या स्टे असून, नेने यांनी केलेल्या तक्रारीच्या बाबतीत सध्या काहीच बोलायचे नसून त्यांना जे करायचे ते करु द्या असे स्पष्ट केले आहे.
सुधाकर चव्हाण यांच्याविरोधात तक्रार
By admin | Published: May 09, 2014 9:13 PM