पुणे : सहकारी साखर कारखाने कवडीमोल दराने विकून हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी संसदेपासून मुख्यमंत्र्यांकडे करूनही दाद मिळत नसल्याने खासदार राजू शेट्टी यांनी अखेर शनिवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या १० वर्षांत राज्यातील ४०हून अधिक सहकारी साखर कारखान्यांची बुडीत कर्जाच्या वसुलीपोटी विक्री करण्यात आली. सरासरी एक हजार कोटी रुपयांचे मूल्य असलेले कारखाने काही कोटींमध्ये विकण्यात आले आहेत. असे कारखाने नातलगांच्या अथवा खासगी कंपनीच्या मार्फत विकत घेण्यात आले आहेत. अगदी पद्धतशीरपणे सहकारी कारखान्यांचा कर्जाचा बोजा वाढवून ३ हजार कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे ४२ कारखान्यांचे तत्कालीन संचालक, अधिकारी, राज्य सहकारी बँक, जिल्हा बँका अशा ८९ जणांविरोधात तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, स्वाभिमानी पक्ष सत्तेत सहभागी असतानाही त्यांना घोटाळा प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करावी लागली. स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, स्वाभिमानी युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले-पाटील, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमरसिंह कदम या वेळी उपस्थित होते. साखर क्षेत्रातील प्रमुख साखर आयुक्त असतो. त्यांनीदेखील या प्रकरणी पुनर्लेखापरीक्षण करणे गरजेचे होते. आता या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. माझा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संपूर्ण विश्वास आहे. मात्र, त्यांच्याकडूनही योग्य कारवाई न झाल्यास न्यायालयाद दाद मागणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. साखर कारखान्यांची बाजारभावापेक्षा कमी किमतीत विक्री करण्यात आली असून, लिलाव प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आलेली नाही. अगदी कवडीमोलाने कारखान्यांची विक्री केल्याचा आमचा आक्षेप आहे. या प्रकरणी संसदेत आवाज उठविला. मुख्यमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, प्राप्तिकर विभागाचे अधिकारी, सक्तवसुली संचालनालय यांच्याकडेही लेखी कारवाईची मागणी केली. मात्र, त्यावर सकारात्मक उत्तर मिळाले नसल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
कारखाने बुडवणाऱ्यांची शेट्टींकडून पोलिसांत तक्रार
By admin | Published: October 23, 2016 4:00 AM