नवी मुंबई : चौथीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीने तिचा विनयभंग झाल्याची तक्रार केली आहे. यानुसार अज्ञाताविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु मुलीने सांगितलेल्या घटनाक्रमानुसार पोलिसांनी तपास केला असता तसे निष्पन्न न झाल्यामुळे पोलिसांची संभ्रमावस्था झाली आहे.बेलापूरमधील शाहबाज गाव येथे गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. परिसरात राहणाऱ्या एका नऊ वर्षांच्या मुलीने तिच्यासोबत गैरकृत्य झाल्याचे घरच्यांना सांगितले. यानुसार घटनास्थळी मुलीच्या कुटुंबीयांसह पोलिसांनी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी एका अज्ञात मुलाने इमारतीच्या छतावर नेऊन गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितले. शिवाय घटनेवेळी आपल्यासोबत लहान भाऊ देखील होता, असेही तिचे म्हणणे आहे. यानुसार एनआरआय पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली. शिवाय मुलीची देखील वैद्यकीय चाचणी केली. दरम्यान, पोलिसांनी तपासाची सूत्रे शीघ्र गतीने हाती घेत ज्या मार्गाने अज्ञात व्यक्तीने नेल्याचे मुलीने तक्रारीत नमूद केले आहे, त्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये मुलीने सांगितल्याप्रमाणे काहीच निष्पन्न झालेले नसल्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले. शिवाय मुलीच्या वैद्यकीय चाचणी अहवालातही तिच्यासोबत गैरकृत्य झालेले नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.ज्या इमारतीच्या छतावर आपल्यासोबत गैरकृत्य झाल्याचे मुलीचे म्हणणे आहे. ती रहिवासी इमारत असून त्या इमारतीमधील रहिवाशांना देखील या प्रकाराची कसलीच कल्पनाही नाही. त्यामुळे पोलिसांची संभ्रमावस्था झाली असून, तक्रारीनुसार बनविलेल्या रेखाचित्राच्या आधारे संशयित तरुणाचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तक्रार
By admin | Published: July 18, 2016 2:43 AM