अलिबाग : तालुक्यात विविध ठिकाणी कांदळवन आणि पाणथळ जागेवर बेकायदा भराव केल्याची तक्रार ‘आपले सरकार’ पोर्टलवर करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. या तक्रारीमुळे सर्वसामान्यांसह विविध उद्योजकही अडचणीत सापडले आहेत. त्यांनी एकत्रित १५६ हेक्टर २१० एकर आणि ११ गुंठे जागेवर बेकायदा भराव केल्याचे समोर आले आहे.तालुक्यातील बेलकडे, नवेदर बेली, नागाव, अलिबाग, कुरुळ येथील रस्त्याशेजारील खाडी, शहाबाज खाडी त्याचप्रमाणे रेवस बंदाराजवळील मिळकत खार, माळा, आवळीपाडा व बागदांडा हे सर्व क्षेत्र कांदळवनांनी बहरलेले आहे. तेथील पाणथळ जागांवर बेकायदा भराव केला जात आहे. त्यामुळे भविष्यामध्ये अलिबाग तालुका पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करुन बेकायदा भराव तात्काळ थांबविण्यात यावे, अशी तक्रार अलिबाग येथील संजय सावंत यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर २६ मे २०१६ रोजी केली होती. या तक्रारीची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. १० जून २०१६ रोजी या प्रकरणी कार्यवाही करण्यास अलिबाग प्रांताधिकाऱ्यांना कळविण्यात आले. अलिबागच्या प्रांताधिकाऱ्यांनी एक महिना २० दिवसांच्या कालावधीत चौकशी करुन ३० जुलै २०१६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला.सावंत यांनी केलेल्या तक्रारीचा फटका सर्व प्रथम शहाबाज येथील पीएनपी मेरीटाईम सर्व्हिसेसला बसला आहे. येथील ग.नं. ३४६ मधील एक हेक्टर ६७ एकर या सरकारी जमिनीवर तसेच सदर मिळकतीच्या लगतच्या जमिनीवर देखील भराव केला आहे. तसेच त्यावर कोळसा साठविण्याचे काम पीएनपी मेरीटाईम करीत आहे. या भरावासाठी लागणारी माती नरेश पाटील यांच्या स.न.८ हिस्सा नं.१ मधून घेण्यात आली आहे. अलिबाग तहसीलदारांनी याबाबत कंपनीसह पाटील यांनाही नोटीस बजावली आहे. त्याचप्रमाणे मिळकत खार येथील ग.नं.३९२/१ मधील तीन हेक्टर ६८ एकर दोन गुंठे, तसेच ग.नं. ४८५/१ आठ हेक्टर १७ एकर आणि एक गुंठे या जागेमध्ये भराव करण्यात आला आहे. यातील गंभीर बाब म्हणजे हा भराव सीआरझेडमध्ये करण्यात आला आहे. ही जमीन जनक हरकिसन वासवानी यांची आहे. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात २०१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जागेत भराव करण्याची परवानगी मागण्यात आली होती. परंतु गुन्हा दाखल असल्याने त्यांना परवानगी देण्यात आली नाही. (प्रतिनिधी)>संघटनेने मागवला खुलासा : बेलकडे येथील ग.नं. १४ मधील ३५ हेक्टर आठ एकर जागेवर ६३६ ब्रास मातीचा बेकायदा भराव करण्यात आला आहे. ही जमीन अलिबाग तालुका मीठ उत्पादक संघटनेला भाडेतत्त्वावर देण्यात आलेली आहे. त्यांच्यावर का गुन्हा दाखल करु नये, असा खुलासा संघटनेकडून तहसीलदारांना मागविला आहे. शहापूर येथील स.नं.५९६/१अ/१ १०९ हेक्टर ५० एकर आणि आठ गुंठे गुरचरण जागेमध्ये शहापूर, ढोलपाडा ग्रामस्थांनी भराव केला आहे. याबाबतचे भराव काढून टाकावा, तसेच संबंधितांवर कारवाई करावी, असे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत. सावंत यांनी केलेल्या तक्रारीमुळे बेकायदा भरावाची मोठमोठी प्रकरणे उघड झाली आहेत. जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेत कारवाईही केली आहे.
पोर्टलवरील तक्रारीची घेतली दखल
By admin | Published: September 19, 2016 2:46 AM