अहमदनगर : ‘ती’ म्हणते, चुलत भावांनी माझ्यावर अत्याचार केला. नातेवाईक म्हणतात, ती १५ वर्षापूर्वीच मेली. पोलीस दावा करतात की, ती जिवंत आहे आणि तिचे आधार कार्ड हा पुरावा आहे....एखाद्या थरारपटात शोभावा असा हा गूढ प्रसंग उभा ठाकलाय तो अहमदनगर शहरात.
‘तिघांनी जबरदस्तीने उचलून नेत माझ्यावर अत्याचार केला’, अशी फिर्याद नगर कोतवाली पोलीस ठाण्यात १० ऑक्टोबर २०२० रोजी एका महिलेने दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, सदर महिलेचा १५ वर्षापूर्वीच मृत्यू झाल्याचा दावा तिच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केला. तर फिर्यादी महिलेचे आधार कार्ड आमच्याकडे असून हीच महिला खरी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ज्या महिलेच्या नावाने फिर्याद दाखल झाली आहे, त्याच महिलेचा शहरातील आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये ३० सप्टेंबर २००५ रोजी मृत्यू झाल्याची महानगरपालिकेत नोंद असल्याचे प्रमाणपत्रच संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी दिले आहे़ त्यामुळे या घटनेचे गूढ वाढले आहे.
या २५ वर्षीय महिलेने तिच्याच चुलत भावांविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात अनैसर्गिक अत्याचार, विनयभंग, पळवून नेणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. १९ सप्टेंबर २०२० रोजी हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे़ दुसºया दिवशी पोलिसांनी यातील दोघा भावांना अटक केली़ या दोघांना न्यायालयाने प्रथम तीन दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली़ अटकेत असलेल्या दोघा भावांच्या आईने १९ ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत फिर्यादी महिलेचा २००५ मध्येच मृत्यू झाल्याचा दावा करत मृत्यूचे प्रमाणपत्रही सादर केले. या परस्पर दाव्यांमुळे पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली असून पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ज्या महिलेच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, ती फिर्याद बनावट आहे. संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याचे महानगरपालिकेतून मिळालेल्या मृत्यू प्रमाणपत्रावर दिसत आहे.-अॅड. बी. एम. झगडे, आरोपीचे वकील
फिर्याद देणारी महिला जिवंत असून तिचे आधार कार्ड पोलिसांकडे आहे. त्यामुळे फिर्यादी महिला बनावट नाही़ फिर्यादीच्या कागदपत्रांची पडताळणी करूनच गुन्हा दाखल केला आहे.- विशाल ढुमे, पोलीस उपअधीक्षक, अहमदनगर