लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: अडीच वर्षांत राष्ट्रवादीकडून काँग्रेसला धोका देण्याचे, कमजोर करण्याचे, विश्वासघात करण्याचे काम झाले आहे. भाजपला ताकद देण्याचा जणू संकल्पच राष्ट्रवादी करीत आहे, हे चुकीचे आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी याची योग्य दखल घ्यावी. वेळेत हे प्रकार थांबवावे. अन्यथा काँग्रेस हायकमांड याची योग्य दखल घेईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.
पटोले सोमवारी उदयपूर अधिवेशनातून नागपुरात परतले. पत्रकारांना पटोले म्हणाले, पहाटेचे सरकार पडल्यानंतर शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनियाजी यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी किमान समान कार्यक्रमावर आधारित महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला.
पटोलेंचा गैरसमज दूर करू: अजित पवार
गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने काँग्रेसला संपवण्याचे काम केले आहे, या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर, हा महाविकास आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. एकत्र बसून योग्य तो मार्ग काढू, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. त्यांचा गैरसमज दूर करू, असेही त्यांनी सांगितले.