नाशिक, दि. २७ - नाशिक मधील राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत भरती करतांना गैर व्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्याने भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आज नाशिकमध्ये वार्ताहर परिषदेत दिली.
आदिवासी विकास विभागामार्फ़त भरती प्रक्रिया राबविताना कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सावरा यांनी माहिती देताना भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त स्तरावरील अधिकार्यामार्फत चौकशी करण्यात येणार असून दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सावरा यांनी सांगितले.
दरम्यान, आदिवासी विकास विभागातील अधिकार्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सुरु झाली. आदिवासी विद्यार्थ्यांना जून महिन्याच्या प्रारंभी शालेय साहित्याचा पुरवठा करावा तसेच आदिवासी वसतिगृहात प्रवेश देण्याचे नियोजन एप्रिल महिन्यातच पूर्ण करावे अशा सूचना सावरा यांनी दिल्या.