लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी २१ जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. तसेच राज्यात ऊस वगळता खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र १३९.६४ लाख हेक्टर असून आतापर्यंत ५६.२१ लाख हेक्टर क्षेत्रावर (४० टक्के) पेरणी झाली आहे, असे राज्याच्या कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.राज्यात खरीप हंगामातील पूर्व मशागतीची कामे सुरू असून कोकण व कोल्हापूर विभागात भात पिकांची धुळवाफ पेरणी झाली आहे. खरीप पिकांच्या पेरणीस सुरूवात झाली असून पेरणी झालेल्या पिकांची उगवण समाधानकारक आहे. राज्यात १ जून ते ३० जून कालावधीचा सरासरी पाऊस २२३.३ मि.मी. असून तो सरासरीच्या ९७.९ टक्के पाऊस झाला आहे. कृषी विभागाने दिलेल्या अहवालानुसार राज्यात बहुतेक जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत २१ जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त टक्के पाऊस झाला आहे. त्यात ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड,लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे. सरासरीच्या तुलनेत सिंधूदुर्ग, जळगाव, सांगली, अकोला, वर्धा या जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झाला़येत्या २४ तासात दक्षिण कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.महाबळेश्वर १८, रत्नागिरी७, अलिबाग ३, पणजी ५, सातारा, सांगली ३, अमरावती ६, ब्रम्हपुरी १७, वर्धा ११ मिमी पावसाची नोंद झाली़
राज्यात ४० टक्के पेरण्या पूर्ण
By admin | Published: July 05, 2017 4:15 AM