मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित घोटाळ््यांबाबत सबळ कागदपत्रे असतानाही तपास पूर्ण करण्यास एवढा वेळ का लागतो, असे खडेबोल मुंंबई उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) गुरुवारी सुनावले. तसेच हा तपास येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.याबाबत आम आदमी पार्टीने गेल्यावर्षी जनहित याचिका दाखल केली. त्याची दखल घेत न्यायालयाने याच्या चौकशीसाठी एसीबी, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाचे विशेष पथक स्थापन केले. त्यानुसार एसीबीने याची चौकशी सुरू केली असून छाप्यांची कारवाई देखील केली जात आहे. या चौकशीची माहिती व एसीबीने केलेल्या कारवाईचा लेखाजोखा हंगामी अॅडव्होकेट जनरल अनिल सिंग यांनी खंडपीठासमोर ठेवला.याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या ११ मुद्यांपैकी नऊ मुद्यांची चौकशी एसीबी करत आहे. यातील तीन आरोपांचा तपास झाला असून पुढील चौकशी सुरू असल्याचे सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. याचिकाकर्त्यांनी कागदपत्रे दिली असतानाही एसीबीला चौकशीसाठी एवढा वेळ का लागतो आहे? हा तपास लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. चौकशीत तथ्य आढळल्यानंतर गुन्हा नोंदवण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट बघू नका, असे मुख्य न्यायाधीश शहा यांनी स्पष्ट केले.यावेळी ईडीनेही याप्रकरणी गुन्हा नोंदवल्याचे न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद करून घेत ईडीने त्यांचा तपास सुरू ठेवावा, असे आदेश न्यायालयाने दिले. मात्र भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला असल्याने त्यांची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला. त्याबाबत न्यायालयाने कोणतेही आदेश दिले नाही. भुजबळ यांच्याविरोधातील तपासाचा अंतरिम अहवाल २२ जुलैला सादर करून त्याचा अंतिम अहवाल १९ आॅगस्टला न्यायालयात सादर करा, असे आदेश खंडपीठाने एसीबीला दिले आहेत. नवी मुंबईतील हेक्स वर्ल्ड या गृहनिर्माण प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी भुजबळांविरोधात गुन्हा नोंदवला. हा प्रकल्प भुजबळ कुटुंबियांच्या कंपनीचा असून यासाठी २ हजार ग्राहकांकडून तब्बल ४४ कोटी रुपये घेतले गेले असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. (प्रतिनिधी)ती तर टायपिंग मिस्टेक - एसीबीमाजी मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबईतील वरळी भागातील सुखदा सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक १९०१ चे क्षेत्रफळ ७५० चौरस फूट असून टायपिंग मिस्टेकमुळे प्रेसनोटमध्ये ते २००० चौरस फूट दाखवले गेले. हा प्रकार अनावधानाने घडल्याचा खुलासा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी केला. भुजबळ यांच्या मालमत्तांवर एसीबीच्या विशेष पथकांनी मंगळवारी ठिकठिकाणी धाडी टाकल्या. या झडतीसंदर्भात प्रसिद्धी पत्रकात मुंबई, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे येथील घर, शेती, दुकाने आणि सदनिकांची माहिती क्षेत्रफळासह देण्यात आली होती. मात्र भुजबळांनी त्यास आक्षेप घेत एसीबीने चुकीची व अवास्तव माहिती प्रसिद्धीला दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एसीबीने हा खुलासा केला. दरम्यान, एसीबीने गुरुवारी मुंबई एज्यूकेशन ट्रस्ट बांद्रा (पश्चिम) येथील कार्यालयाची झडती घेतली.
तपास दोन महिन्यांत पूर्ण करा
By admin | Published: June 19, 2015 2:32 AM