संपूर्ण नामांतर; आता छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हाही; नामकरण फलकाचे अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 06:52 AM2023-09-17T06:52:25+5:302023-09-17T06:53:16+5:30
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर करण्याबाबत विभागीय आयुक्तालयाकडे एकूण सात लाख चार हजार ६५६ आक्षेप आणि सूचना दाखल झाल्या होत्या
छत्रपती संभाजीनगर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’,च्या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर विभागाचे आणि धाराशिव जिल्हा नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते झाले.
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर करण्याबाबत विभागीय आयुक्तालयाकडे एकूण सात लाख चार हजार ६५६ आक्षेप आणि सूचना दाखल झाल्या होत्या. त्याबाबत काहीही निर्णय न होताच जिल्हा व महसूल विभागाचे औरंगाबाद हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्यात आले.
न्यायालयात आव्हान देऊ
तीन दशकांपासून जिल्ह्याच्या नामकरणाविरोधात न्यायालयात लढत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मुश्ताक अहमद म्हणाले, सरकारने हरकती, आक्षेपांवर काहीही सुनावणी न घेता गॅझेट काढले. सुनावणीपूर्वीच नामफलकाचे अनावरण करणे हे कायदेशीर नाही.