यवतमाळ : बहुप्रतीक्षित वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेप्रकल्पाचे बजेट सातत्याने वाढत आहे. त्यामुळे हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करावा, अशी मागणी माजी खासदार विजय दर्डा यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना भेटून केली आहे. यावर त्यांनी वेगाने काम पूर्ण करण्याची व त्यासाठी निधी कमी न पडू देण्याची ग्वाही दर्डा यांना दिली.विदर्भ-मराठवाड्यासाठी हा रेल्वेप्रकल्प महत्वाकांक्षी ठरला आहे. या प्रकल्पाचा विजय दर्डा यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती काय अशी विचारणा जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. तेव्हा वर्धा व नांदेड जिल्ह्यात भूसंपादनाची अडचण नाही. यवतमाळातही शेतकरी जमिनी देण्यास तयार आहेत. त्यांना नव्या कायद्यानुसार पाचपट मोबदला दिला जाणार आहे. मात्र रेल्वेप्रशासनाचे नियोजन नसल्याने यवतमाळात प्रकल्पाच्या कामाची गती संथ असल्याची बाब यावेळी पुढे आली. त्याबाबत दर्डा यांनी नाराजी व्यक्त केली. राज्य शासनाने आपल्या वाट्याचा ४० टक्के निधी दिला आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या मोबदल्यातील वाढीव रकमेचा बोजाही उचलण्याची तयारी दर्शविली आहे.रेल्वे मंत्र्यांची घेतली मुंबईत भेटया प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातून नुकतेच ७३८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. याबाबत सुरेश प्रभू यांचे दर्डा यांनी अभिनंदन केले. शिवाय ही रक्कम कमी असल्याची खंतही त्यांच्याकडे व्यक्त केली. यावर प्रभू यांनी प्रकल्पाचे काम थांबणार नाही, अशी ग्वाही दिली. दिलेल्या पैशातून राज्य शासनाने प्राधान्यक्रम ठरवावा, असे प्रभू यांनी सुचविल्याचे दर्डा यांनी चर्चेत सांगितले.त्यानंतर दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाची आवश्यकता का, हे त्यांना पटवून दिले. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी भूसंपादनात पैशाची अडचण येणार नाही, असा शब्द दिल्याचे दर्डा यांनी सांगितले. शिवाय यवतमाळ येथे रेल्वे उद्यान आणि वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासंदर्भात रेल्वे मंत्र्यांचे स्वीय सहायक विजयकुमार पिंगळे यांची दर्डा यांनी दिल्लीत भेट घेतली. यावेळी खुद्द रेल्वेमंत्री प्रभू यांच्याकडून या प्रकल्पासंदर्भात सूचना असल्याचे पिंगळे यांनी सांगितल्याचे दर्डा यांनी स्पष्ट केले. त्यानंतरही रेल्वे प्रशासनाकडून हा प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याबाबत कोणतेही नियोजन व हालचाली दिसत नाहीत.सन २०२२ पर्यंत या मार्गावरून वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे धावावी, असे रेल्वे प्रशासनाचे नियोजन असल्याची माहिती दर्डा यांनी या बैठकीत दिली. मात्र याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होण्यासाठी पुन्हा रेल्वे मंत्र्यांकडे व मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. प्रकल्पाच्या कुठल्याही कामात अडचणी आल्यास आपण सदैव उपलब्ध असल्याचा शब्दही दर्डा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. (कार्यालय प्रतिनिधी)शब्द पाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यवतमाळातील ‘प्रेरणास्थळ’ येथे आयोजित कार्यक्रमात दिली होती. त्यांनी तो शब्द पाळला आणि प्रकल्पाला मुबलक निधी उपलब्ध करून दिला. - आश्वासनाची पूर्तता केल्याबद्दल विजय दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांनी मुंबई भेटीत राज्याच्या वाट्याला आलेल्या ४० टक्के निधीसह अतिरिक्त भार उचलण्याचीही ग्वाही दिली. या प्रकल्पासाठी मंत्रालयात ‘वॉर रुम’ उघडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेप्रकल्प पूर्ण करा
By admin | Published: February 19, 2017 1:51 AM