मुंबई- मेट्रो 3 कुलाबा ते सिप्झ या मेट्रोच्या कामाने वेग पकडला असून ही मेट्रो मुंबईकरांच्या पुढील पन्नास वर्षांसाठीची तरतूद आहे. प्रत्यक्ष काम पाहिल्यावर त्याची अनुभूती येते, समाधान वाटते, एवढ्या कमी वेळात मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत, अशा शब्दात मुंबई भाजपा आमदार अॅड. आशिष शेलार यांच्यासह भाजपा आमदारांनी समाधान व्यक्त केले.मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आज भाजपा आमदार भाई गिरकर, योगेश सागर, प्रसाद लाड यांनी मेट्रो 3 च्या कामाचा पाहणी दौरा केला. यावेळी एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि अन्य अधिकारीही उपस्थित होते. प्रथम आझाद मैदान येथील भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी करण्यात आली. सुमारे 150 मीटर खाली उतरून प्रत्यक्ष बोगद्यात उतरून या सर्वांनी कामाची माहिती अश्विनी भिडे यांच्याकडून जाणून घेतली.येथे एका बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली असून दुसऱ्या लाईनच्या बोगद्याचे मशीनही खाली उतरवण्यात आले आहे. नयानगर सह एकूण 200 मीटरच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून कामाने वेग पकडला आहे. तर त्यानंतर गिरगावातील मेट्रो स्टेशनचे जे काम सुरू आहे त्याचीही पाहणी केली. यावेळी बोलताना आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, मेट्रो ची कामे सुरू आहेत त्यामुळे मुंबईकरांची आज गैरसोय होते आहे. पण त्यातून भविष्यात मोठे काम उभे राहणार आहे. आज मुंबईकर ज्या पध्दतीने गैरसोय सहन करीत आहेत त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत. आम्ही लोकप्रतिनी आहोत. नेमके काम किती झाले आहेत व ते कसे केले जात आहे हे पाहता यावे म्हणुन आज आम्ही हा दौरा केला. काही प्रश्न आम्हाला होते तसेच लोक आम्हाला विचारतात त्याची माहितीही जाणून आम्ही घेतली.प्रत्यक्ष काम पाहिल्यावर इंजिनिरींगच्या कामाचा हा अविष्कार असल्याची अनुभूती येते. काम समाधानकारक सुरू आहे. ज्या वेगाने मुंबईत सर्व मेट्रो ची कामे सुरू आहेत ती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईकरांच्या वतीने आभारच मानायला हवेत. ही मेट्रो मुंबईतील सिध्दीविनायक, मुंबा देवी, महालक्ष्मी, हाजी अली, माहिम दर्गा, चैत्यभूमी आणि माहीम चर्च सर्व धार्मिक स्थळे जोडणारी आहे. तसेच ती मोठी हास्पीटल यांनाही जोडणारी आहे. त्यामुळे मुंबई येणाऱ्या पर्यटकांना सुविधा होईलच शिवाय मुंबईकरांची ही गैरसोय दूर करणारी आहे. असेही आमदार अॅड आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, आमदार अॅड. आशिष शेलार आणि सर्वच भाजप आमदारांनी कामाबद्दल समाधान व्यक्त करीत अधिकारी, काम करणार्या कामगार, इंजिनिअर व त्यांच्या टीमचे कौतुक करून आभार ही मानले. आमदार प्रसाद लाड यांनी ही कामाबाबत समाधान व्यक्त करीत ही मेट्रो मुंबईकरांची भविष्य आहे अशा भावना व्यक्त केल्या तर आमदार भाई गिरकर आणि योगेश सागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले दिल्ली आणि अन्य शहरात मेट्रो होती पण मुंबईकरांसाठी ही सेवा मुख्यमंत्र्यामुळे उपलब्ध होणार आहे असे सांगितले. तर पश्चिम उपनगरातील मुंबईकर कोणत्याही अडथळ्यावीना या मेट्रोमुळे कुलाब्या पर्यंत येईल. त्यामुळे ही सेवा अत्यंत महत्त्वाचीच ठरेल असे सांगितले.
मेट्रो 3च्या सुमारे 200 मीटर बोगद्याचे काम पूर्ण, अॅड. आशिष शेलार यांनी केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 1:46 PM