पुणे : राज्य शासनाने महापालिकांसाठी चारचा एक प्रभाग करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर, पुढील कार्यवाहीसाठी महापालिकेकडून राज्य शासनाच्या आदेशाची वाट पाहिली जात आहे. तोपर्यंत लोकसंख्येनुसार ३ हजार गणक बनविणे, गुगल इमेजेस घेणे आदी पूर्व तयारी पालिका प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे.राज्य शासनाने आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुका ४ सदस्यांचा एक प्रभाग, यापद्धतीने घेण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. सध्या दोनचा प्रभाग अस्तित्वात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रभाग रचनेमध्ये फेरफार होणार आहेत. पुणे महापालिकेमध्ये एकूण ३८ प्रभाग होणार आहेत. या प्रभागांची रचना कशी असेल, याकडे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीचे प्रभाग पाडताना सत्ताधाऱ्यांकडून मोठ्याप्रमाणात हस्तक्षेप होतो, अशी टीका सातत्याने केली जाते. या पार्श्वभूमीवर सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रभागरचना करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. याबाबत सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे प्रभागरचना तयार करण्यासाठी नेहमीपेक्षा खूपच कमी वेळ लागेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. चार सदस्यांचा एक प्रभाग, अशी रचना तयार केल्यानंतर ती नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर सूचना व हरकती नागरिकांना नोंदविता येतील. त्यानंतर प्रभागरचनेला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. >लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमधून नावे वगळली गेल्याने मोठा गोंधळ झाला होता. महापालिकेच्या निवडणुकांमध्ये असा गोंधळ होऊ नये, याकरिता विशेष दक्षता घेतली जात आहे. मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. दुबार, मयत नावे वगळण्यात येत आहेत.
पालिका प्रभाग पद्धतीची पूर्वतयारी पूर्ण
By admin | Published: June 11, 2016 12:47 AM