शीलेश शर्र्मा, नवी दिल्लीरेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रात ५२,६१४ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ३५ रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याशिवाय सात नव्या रेल्वे प्रकल्पांवरही विचार केला जात आहे आणि या प्रकल्पांसाठी १८,९८४ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद सुनिश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता ७१,५९८ कोटी रुपये खर्चाचे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राज्यसभेत दिली. काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी महाराष्ट्रातील रेल्वे मंत्रालयाच्या प्रकल्पांबद्दलची विस्तृत माहिती मागितली होती. दर्डा यांना रेल्वे प्रकल्पांविषयीची माहिती देताना प्रभू म्हणाले, ७१,५९८ कोटी रुपयांचे हे रेल्वेप्रकल्प पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार संयुक्तपणे एका नव्या कंपनीची स्थापना करणार आहे. या कंपनीची स्थापना लवकरच केली जाईल, अशी आशा आहे. हे सर्व रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी या कंपनीवर राहील. मुंबईबाबतची रेल्वे मंत्रालयाची भूमिका स्पष्ट करताना रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले, मुंबईसाठी अतिरिक्त १९,२३७ कोटी आणि ३५ हजार कोटींचे प्रकल्प तयार केले जातील. ज्यामुळे महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक केली जाऊ शकेल.प्रकल्प पूर्ण करण्याच्या मार्गात येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करताना प्रभू म्हणाले, भूसंपादन ही सर्वांत मोठी समस्या आहे. ही समस्या नेहमीच भेडसावत असते. भूसंपादनासाठी रेल्वे कायदा आहे, हे खरे असले तरी राज्य सरकारने भूसंपादनासाठी रेल्वे मंत्रालयाला सहकार्य केले पाहिजे. नुकसान भरपाईच्या संदर्भात राज्य सरकारला जी नुकसान भरपाईची रक्कम उचित वाटेल, ती देण्यास रेल्वे मंत्रालय तयार आहे.
७१,५९८ कोटींचे प्रकल्प पूर्ण करणार
By admin | Published: May 12, 2016 3:34 AM