औषध विक्री-खरेदी आणि उत्पादन प्रक्रियेत पारदर्शकता यावी, सर्व प्रक्रियांवर केंद्र सरकारचा अंकुश राहावा म्हणून सरकारने ई-पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, या निर्णयाला औषध विक्रेत्यांनी आणि उत्पादकांनी विरोध केला आहे. विरोध दर्शविण्यासाठी मुंबईसह देशातील औषध विके्रत्यांनी बंद पुकारला होता. आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन (एआयओसीडी)ने विरोध करत संप पुकारला होता. या बंदच्या आधीच फूट पडल्याने मुंबईसह राज्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनच्या माहितीनुसार, संपात मोठ्या प्रमाणात औषध विके्रते सहभागी झाले नव्हते. मुंबईतील ३० टक्के औषध दुकाने तर राज्यातील १२ ते १३ हजार दुकाने सुरू होती. बंद काळात रुग्णांची-ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी एफडीएने खासगी-सरकारी रुग्णालयांतील औषध दुकानांत मुबलक औषधे उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे अनेक रुग्णालयांमधील औषध दुकानांमध्ये औषधे उपलब्ध होती. काही संघटनांनी मात्र संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.
औषध विक्रेत्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2017 4:44 AM