मुंबई : २५ टक्के पगारवाढीच्या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसकडून (इंटक) गुरुवारी संप पुकारण्यात आला होता. विदर्भ, मराठवाडा वगळता अन्य ठिकाणी मात्र संपाला प्रतिसाद मिळाला नाही. २७0 डेपोंपैकी ७0 डेपो बंद करण्यात आले होते. त्यामुळे काही ठिकाणी प्रवाशांचे हाल झाले. महाराष्ट्र एसटीतील चार कर्मचाऱ्यांनी कर्जबाजारी झाल्यामुळे नुकत्याच आत्महत्या केल्या आहेत. या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येसोबत राज्य सरकार आणि एसटी प्रशासन असंवेदनशील असल्याचा आरोप इंटककडून करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन करार करून २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यात यावा, अशी मागणी इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यासाठी गुरुवारी संप पुकारण्यात आला होता. हा संप पुकारताच मराठवाडा, विदर्भात संपाचा परिणाम जाणवला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत २३ डेपोंवर संपाचा परिणाम झाला होता. त्यानंतर दिवसभरात २५0पैकी ७0 डेपो बंद झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र संपाचा परिणाम जाणवला नाही. या संपामुळे १० लाखांपेक्षा जास्त प्रवाशांना फटका बसल्याचे सांगितले जात आहे. मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहील, असे संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले. वाहतुकीला फटका मराठवाडा, खान्देशात जाणाऱ्या प्रवाशांना पुण्यातून बस मिळाल्या नाहीत, त्यामुळे त्यांचे हाल झाले. नगरमध्ये प्रवासी खासगी गाड्यांनी जाताना दिसत होते. नाशिकमध्ये आंदोलकांनी ऐच्छिकपणे सेवा देण्याऱ्या वाहक-चालकांना दमबाजी क रत त्यांच्या बसेसच्या टायरमधील हवा काढली.
संपाला राज्यात संमिश्र प्रतिसाद
By admin | Published: December 18, 2015 2:10 AM