सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही; विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 06:35 AM2023-10-15T06:35:31+5:302023-10-15T06:36:29+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना नार्वेकर म्हणाले की, पुढची कारवाई योग्य कायदेशीर सल्ला घेऊन केली जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आमदार अपात्रतेबाबत सुनावणीसाठी वेळापत्रक जाहीर करा आणि दोन महिन्यात निर्णय घ्या, असा कोणताही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नाही. विधिमंडळाच्या सार्वभौमत्वाशी मी कोणत्याही प्रकारे तडजोड होऊ देणार नाही. कोर्टाने दिलेल्या आदेशांचा मी योग्यरीत्या आदर ठेवत विधिमंडळाचे सार्वभौमत्व कायम ठेवण्यासाठी कार्यवाही करेन, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शनिवारी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना नार्वेकर म्हणाले की, पुढची कारवाई योग्य कायदेशीर सल्ला घेऊन केली जाईल. कोण, काय म्हणते याकडे मी लक्ष देत नाही. न्यायालयाच्या आदेशात जे लिहिलेले आहे, त्याबद्दल मी दखल घेतो. पण आज जी प्रत माझ्या हाती आहे, ती ऑनलाइनही उपलब्ध आहे. ती तुम्ही वाचून पाहा. त्यात कुठेही कोर्टाने माध्यमांनी म्हटल्यानुसार किंवा इतरांकडून जी टीकाटिप्पणी केली जातेय, तसे आदेशात म्हटलेले नाही.
हे तर माझे कर्तव्यच...
मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्या संविधानात न्याय मंडळ, विधिमंडळ, कार्यकारी मंडळ या तिघांनाही समान स्थान दिलेले आहे.
कोर्टाचा आदर ठेवणे किंवा संविधानातून निर्माण झालेल्या इतर संस्थांचा आदर ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
ज्याचा संसदीय लोकशाहीवर विश्वास आहे तो निश्चितपणे संविधानाने निर्माण केलेल्या या संस्थांचा मान राखेल.
माझा संविधानावर पूर्ण विश्वास असल्यामुळे कोर्टाच्या आदेशाच मान राखणे हे माझे कर्तव्य आहे. ते मी पार पाडणार आहे, असेही नार्वेकर म्हणाले.