पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांनी चुकीचा इतिहास लिहिला आहे. त्यांना विरोध म्हणजे एका विशिष्ट जातीला केलेला विरोध असे समजू नये. आम्ही सत्य इतिहास मांडत असून त्यासाठी पडेल ती किंमत मोजायला तयार आहोत. पुरंदरे यांना देण्यात आलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मागे घेईपर्यंत ही वैचारिक लढाई सुरूच राहील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी येथे दिला.छत्रपती शिवाजी महाराज बदनामीविरोधी कृती समितीच्या वतीने लाल महाल येथे आयोजित शिवसन्मान जागर महिला परिषदेत ते बोलत होते. या वेळी कॉ. गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे, प्रा. प्रतिमा परदेशी, श्रीमंत कोकाटे आदी उपस्थित होते. तसेच सत्यशोधक प्रबोधन महासभा, संभाजी ब्रिगेड या संघटनांचाही सहभाग होता. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांचे विचार मान्य नाहीत, म्हणून त्यांच्यावर गोळ््या घालण्यात आल्या. इतिहासातही अनेकांना अशाप्रकारे विरोध करण्यात आला. पुरंदरे राजमाता जिजामातांचे चारित्र्य हनन करत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा आव्हाड यांनी दिला. खोटे शिवचरित्र लिहिणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते आणि खरे शिवचरित्र लिहिणाऱ्यांना गोळ््या घातल्या जातात. पानसरे यांच्या हत्येमागे हिंदुत्ववादी संघटनेचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्मिता पानसरे म्हणाल्या.पानसरे यांचे मारेकरी सापडले, पण...पानसरे यांचे मारेकरी सापडले असून त्यांचे फोन नंबर्सही ट्रेस झाले आहेत. पण केवळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे आणि राजकीय दबावामुळे मारेकऱ्यांना पकडले जात नाही. त्यामुळे पानसरे यांच्या कुटुंबातील सदस्य सांगतील ते दोन पोलीस अधिकारी एसआयटीत घ्यावेत, अशी मागणी आव्हाड यांनी केली.
पुरस्कार मागे घेईपर्यंत वैचारिक लढा सुरूच
By admin | Published: August 09, 2015 2:34 AM