नागपूर : अश्लील चित्रांच्या पोस्टर्समुळे समाजात वैचारिक प्रदूषण पसरते. असे पोस्टर्स जाहीरपणे लावणे कोणाच्याच हिताचे नाही. देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीच्या भावना दूषित करणारा हा प्रकार आहे, असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी व्यक्त केले. याबाबत चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाच्या सचिवांना दिले.सामाजिक कार्यकर्ते तेजिंदरसिंग रेणू यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अश्लील चित्रांचे पोस्टर्स जाहीरपणे प्रसिद्ध केले जात असल्याचे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, असे न्यायालयाने सांगितले. तसेच, अश्लील पोस्टर्स जाहीरपणे प्रसिद्ध होणार नाही, यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहे किंवा कोणत्या उपाययोजना करणे शक्य आहे, अशी विचारणा केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाला करून उत्तरामध्ये यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले. (प्रतिनिधी)
अश्लील चित्रांमुळे वैचारिक प्रदुषण
By admin | Published: January 28, 2017 3:45 AM