मुंबई - राज्यातील ३१ लाख शेतकऱ्यांकडे कर्जाची थकबाकी असली तरी एक कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कर्जफेड वेळेत केलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सवलती देताना या दोघांनाही त्या देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने काल नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन कर्जमाफी व इतर सवलतींसाठी साकडे घातले होते. त्या विषयीचे निवेदन विरोधकांच्या गदारोळातच मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत केले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार जी योजना तयार करेल त्यात राज्य सरकारदेखील आर्थिक भार निश्चितपणे उचलेल. ३१ लाख शेतकऱ्यांकडे ३० हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज थकित आहे पण एकूण शेतकरी खातेदारांची संख्या १ कोटी ३४ लाख इतकी आहे. याचा अर्थ एक कोटींपेक्षा जास्त शेतकरी वेळेत कर्ज परतफेड करीत आहेत. ज्यांनी कर्ज वेळेत भरले त्यांना सवलती दिल्या नाहीत आणि कर्ज न भरणाऱ्यांना त्या दिल्या तर भविष्यात कर्ज न भरण्याची प्रवृत्ती बळावेल. त्यामुळे सवलती देताना दोघांमध्ये भेद केला जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आज सभागृहात जे गोंधळ घालत आहेत त्यांच्यामुळे शेतकऱ्यांची गेल्या १५ वर्षांत वाईट अवस्था झाली होती. आज केवळ घोषणाबाजी करून ते शेतकऱ्यांचे कैवारी ठरू शकत नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले. (विशेष प्रतिनिधी)
कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सवलती
By admin | Published: March 19, 2017 1:41 AM