ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली. या बैठकीत कर्जमाफीच्या मुद्यावर कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. अवघ्या अर्ध्या तासाच्या आत ही बैठक आटोपली. त्यामुळे तूर्तास तरी शेतक-यांना दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांचा या शिष्टमंडळात समावेश होता. शेतक-यांच्या हितासाठी केंद्र सरकारने योजना आणावी. शेती क्षेत्रात गुंतवणूक वेळेची गरज आहे. राज्य सरकारही आपला वाटा उचलायला तयार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतक-याच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारचे जे प्रयत्न सुरु आहेत त्याला संपूर्ण पाठिंबा देण्याचे तसेच आमच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचा दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सध्या सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन सभागृहात विरोधकांकडून गदारोळ सुरु आहे. विरोधकांना यामध्ये सत्तेत सहभागी असलेली शिवसेनाही साथ देत आहे. राज्यातील शेतक-यांचं एकूण कर्ज 30 हजार 500 कोटी आहे. इतक कर्ज माफ केल्यास विकासासाठी राज्य सरकारकडे पैसा उरणार नाही त्यामुळे केंद्राने मदत करावी अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे.