पिंपरी : देशभरातल्या कष्टकरी कामगारांची अवस्था दयनीय असून त्यांना लॉकडाउन काळातील वेतन मिळाले पाहिजे त्यांना इच्छित स्थळी जाण्याची सुविधा केली पाहिजे. निघाल्यापासून ते पोहचेपर्यंत मोफत प्रवास व त्यांना अन्न, पाण्याची सुविधा मिळावी. वैद्यकीय तपासण्या मोफत कराव्यात. सर्व स्थलांतरित कामगारांचे प्रश्न सोडवावेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जन आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी भोसरी येथे केले. मेधा पाटकर यांनी रविवारी पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, चिंचवडसह इतर ठिकाणी परप्रांतीय कामगार वस्ती, कंपनी कामगार अशा कामगारांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते तसेच गिरीश वाघमारे, इब्राहिम खान, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार, वंदना थोरात, सचिन नागणे, राजेश माने सुनीता पोतदार, शब्बीर शेख आदी या वेळी उपस्थित होते.राज्यासह परराज्यातील कामगारांनीही आपल्या समस्या मेधा पाटकर यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी त्याची नोंद करत त्यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासित केले. रेशन दुकानास भेट देऊन त्यांच्याकडे आलेला साठा व वितरण याबाबत माहिती घेतली. तसेच रेशन दुकानदारांना काही सूचना केल्या. मेधा पाटकर म्हणाल्या, कामगारांना त्यांच्या हक्काचे रेशन मिळाले पाहिजे. सध्याच्या स्थितीमध्ये रेशनिंगच्या बाबतीतल्या अडचणी दूर करून तीन महिन्यापर्यंत मोफत रेशन देण्याची सुविधा करणे गरजेचे आहे. विविध राज्यातील कामगारांना गावी जाण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे, त्याचबरोबर राज्य परिवहन महामंडळ , रेल्वे प्रशासन यांनी ही टाळाटाळ न करता त्यांना सहकार्य करावे आणि त्यांना इच्छित स्थळी जाण्याची सोय करून द्यावी. अनेक ठिकाणी कामगारांची आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी होत आहे, परंतु त्यांना सुविधा मिळत नाहीत. विविध ठिकाणच्या कामगारांना लॉकडाऊनच्या पूवीर्पासूनचे आणि लॉकडाऊन काळातील त्यांचे वेतन मिळणे बाकी आहे. त्यांना सामाजिक जबाबदारी म्हणून वेतन मिळाले नाही. याची जबाबदारी मालक व व्यवस्थापनाने घ्यावी. कम्युनिटी किचन प्रशासनाकडून बंद केल्यामुळे अनेक लोकांचे हाल होत अहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महिनाभर त्यांना जेवणाची सुविधा चालू ठेवावी.
देशभरातील कामगारांची अवस्था दयनीय; मूळगावी परतण्यासाठी त्यांना पूर्ण सुविधा द्या : मेधा पाटकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 1:34 PM
सर्व स्थलांतरित कामगारांचे प्रश्न सोडवावेत.
ठळक मुद्देभोसरी, चिंचवड येथील कष्टकऱ्यांच्या समजून घेतल्या अडचणीरेशन दुकानास भेट देऊन त्यांच्याकडे आलेला साठा व वितरण याबाबत घेतली माहिती