कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा पारंपारिक पद्धतीने केवळ २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. याबाबतचा निर्णय शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आमदार विनय कोरे व पुजारी यांच्या संयुक्त बैठकीत झाला.दरवर्षी श्री जोतिबाची चैत्र यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी होते. या यात्रेसाठी अन्य राज्यातून ८ ते ९ लाख भाविक उपस्थित असतात. मात्र गतवर्षी कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्याने यात्रा रद्द करण्यात आली. सासनकाठ्यांनाही परवानगी नाकारली गेली व पालखी सजवलेल्या वाहनातून यमाई मंदिराकडे नेण्यात आली.
यंदा पून्हा लॉकडाऊन झाले असले तरी सलग दुसऱ्यावर्षी यात्रा रद्द करणे योग्य होणार नाही म्हणून आमदार विनय कोेरे यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली व नियमाधीन राहून यात्रा कशी पार पाडता येईल यावर चर्चा केली. त्यानुसार केवळ २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत यात्रेचे धार्मिक विधी पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.