जळगाव : घरकूल प्रकरणात माजी कृषी व परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला. मात्र जामीन मंजूर करताना त्यांना जळगाव व धुळे या दोन जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.जामिनावरील मुक्ततेनंतर त्यांचे पुण्यातच वास्तव्य असावे आणि त्यांनी तेथील पोलीस आयुक्तालयात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे. न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांच्या न्यायालयात देवकर यांच्या जामीन अर्जावर कामकाज झाले. घरकूल प्रकरणातील नगरसेवकांना न्यायालयाने यापूर्वी जामीन मंजूर केला आहे. देवकर यांचा या गुन्ह्यातील सहभाग हा इतर नगरसेवकांसारखाच आहे. अन्य आरोपींप्रमाणे देवकर यांनीसुद्धा या प्रकरणात आर्थिक लाभ घेतलेला नसल्याचा युक्तीवाद ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांनी केला. विधानसभा निवडणुकीत देवकर यांचा पराभव झाल्याने त्यांचा राजकीय प्रभावदेखील राहिलेला नसल्याचे आणि गेल्या वर्षभरापासून ते कारागृहात असल्याचे सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आणखी काही दिवस या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता नसल्याने त्यांना जामीन मंजूर करावा, असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला. सरकारतर्फे संजय खर्डे-पाटील यांनी युक्तीवाद केला. जिल्हा न्यायालयाने देवकर यांना जामीन दिल्यानंतर उच्च न्यायालयाने तो रद्द केला होता. त्या परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याने त्यांना जामीन देऊ नये, अशी बाजू त्यांनी मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर देवकर यांना सशर्त जामीन मंजूर केला. देवकर यांना किती रकमेच्या जातमुचलक्यावर मुक्त करावे, याबाबत धुळे न्यायालयाने निर्णय घ्यावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)काय आहेत अटी ?देवकर यांनी जळगाव व धुळे जिल्ह्यात वास्तव्य करू नये. धुळे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश असल्यासच ते तेथे जाऊ शकतात. पुणे येथे वास्तव्याला असताना पोलीस आयुक्तालयात हजेरी लावावी. पुण्यातून बाहेर जायचे असल्यास २४ तासआधी पोलीस आयुक्तांना माहिती द्यावी. रुग्णालयात उपचारदेवकर सध्या न्यायालयाच्या आदेशान्वये धुळ््यातील देवपूरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा कारागृह अधीक्षक बी. आर. मोरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
गुलाबराव देवकर यांना सशर्त जामीन
By admin | Published: January 06, 2015 2:07 AM