- डिप्पी वांकाणी/जयेश शिरसाट, मुंबई शीना बोरा हिच्या हत्येच्या गुन्ह्यात आपला सहभाग असल्याची कबुली इंद्राणी मुखर्जीचा दुसरा पती संजीव खन्ना याने दिली असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. त्यामुळे मुख्य आरोपी इंद्राणीचा हत्येतील सहभाग स्पष्ट झाला असून, तपासाला आता नवे बळ मिळाले आहे. शिवाय अखेरच्या दिवसांमध्ये शीना इंद्राणीला सातत्याने ब्लॅकमेल करत असल्यानेच ही हत्या करण्यात आल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस आले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. खन्नाच्या चौकशीसाठी स्वत: राकेश मारिया अनेक तास खार पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. रात्री अकराच्या सुमारास चौकशी आटोपून खार पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर मारिया म्हणाले, तिसऱ्या आरोपीने (संजीव खन्ना) गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली आहे. याशिवाय शीनाचा सख्खा भाऊ मिखाईल बोरा यानेही तपासाला उपयुक्त ठरेल अशी माहिती पुरवली आहे. त्याची शहानिशा सुरू आहे.देहराहूनला तपासासाठी गेलेल्या खार पोलिसांच्या हाती शीनाचा पासपोर्ट लागला आहे. त्यावरून शीना अमेरिकेत आहे हे सर्वांना पटवून देणारी इंद्राणी खोटे बोलत होती हे स्पष्ट होते, असे मारिया यांनी सांगितले. शीनाची हत्या झाली त्यादिवशी पीटर लंडनमध्ये होते, अशी माहिती संजीवच्या चौकशीतून पुढे आली आहे.रायगडच्या पेण तालुक्यातील गागोदे गावातून शुक्रवारी खार पोलिसांना सापडलेले मृतदेहाचे अवशेष शनिवारी वैद्यकीय तपासणीसाठी कलिना येथील प्रयोग शाळेत धाडण्यात येणार आहेत, असे मारिया म्हणाले. अप्पर आयुक्त वादात२०१२मध्ये गागोदे खिंडीत सापडलेल्या मृतदेहाबाबत पेण पोलिसांनी डायरी एन्ट्री केली. मात्र तत्कालिन पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार पुढील तपास/कारवाई बंद करण्यात येत आहे, असे टीपण त्या डायरीवर सापडल्याची माहिती मिळते. अशा सूचना देणारे रायगडचे तत्कालिन अधीक्षक सध्या मुंबईत अप्पर आयुक्त म्हणून नेमणुकीस आहेत. याबाबत खातरजमा केली जाईल, अशी प्रतिक्रिया महासंचालक संजीव दयाळ यांनी माध्यमांना दिली आहे.
संजीवने दिली गुन्ह्यातील सहभागाची कबुली
By admin | Published: August 29, 2015 2:33 AM