मुंबई : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडलीने इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोएबाची आत्मघातकी दहशतवादी असल्याची साक्ष दिल्याने गुजरात पोलिसांच्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे, असे मत माजी आयपीएस अधिकारी डी.जी. वंजारा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. वंजारा हे या बनावट चकमक प्रकरणातील एक आरोपी असून, त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. वंजारा म्हणाले की, हेडलीने केलेला खुलासा नवीन नाही. गुजरात पोलीस पूर्वीपासून तेच सांगत आहेत. मात्र राजकीय षड्यंत्रामुळे गुजरात पोलिसांचा बळी गेला. पोलिसांना कारागृहात जावे लागले. याआधी या गोष्टीची केवळ चर्चा सुरू होती. मात्र आज हेडलीने न्यायालयासमक्ष साक्ष दिल्याने पोलिसांच्या दाव्याला वजन प्राप्त झाले आहे.राजकीय षड्यंत्राबाबत मात्र थेट कोणत्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्तीचे नाव घेणे वंजारा यांनी टाळले. चकमकीवेळी इशरत तीन दहशतवाद्यांसोबत काय करत होती, असा सवाल वंजारा यांनी केला. ते म्हणाले की, राजकीय षड्यंत्रापोटीच तीन दहशतवाद्यांबद्दल ‘ब्र’ही न काढता केवळ विद्यार्थिनी असलेल्या इशरतच्या नावाचीच चर्चा केली गेली. लष्कर-ए-तोएबाच्या मुखपत्रातूनही इशरत दहशतवादीच असल्याचा खुलासा करण्यात आला होता. मात्र तरीही पोलिसांच्या भूमिकेकडे संशयाने पाहिले गेले. (प्रतिनिधी)
गुजरात पोलिसांच्या दाव्याला पुष्टी - वंजारा
By admin | Published: February 12, 2016 2:29 AM