मुंबई : काही दिवसांपासून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात सामना रंगत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भोपाळ येथील भाषणात थेट राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्या घराणेशाहीवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे महाराष्ट्रात या दोन पक्षांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गेले काही दिवस वाक्युद्ध रंगताना दिसत आहे. ओबीसीवरून राष्ट्रवादीला फडणवीस यांनी घेरले आणि लगेच पवार यांनी राष्ट्रवादीने मोठे केलेल्या नेत्यांची यादी वाचून दाखवली. ‘शिंदेंनी केली ती गद्दारी मग पवारांनी वसंतदादा पाटील यांना धोका देऊन पुलोदचे सरकार जनसंघासोबत स्थापन केले ते काय होते,’ असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. पवार यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तरही दिले. त्यातच आता मोदी यांच्या विधानाने संघर्ष शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे.
मोदी यांनी शरद पवार यांचे बोट धरून आपण राजकारणात पुढे गेल्याचे म्हटले होते, त्याच मोदींनी आता पवारांवर निशाणा साधला. काही महिन्यांवर आलेली लोकसभा निवडणूक आणि राज्यात भाजप-शिवसेना विरुद्ध मविआ अशी लढत रंगण्याची चिन्हे असताना मोदींनी राष्ट्रवादीला लक्ष्य केल्याचे मानले जात आहे.
मोदीजी म्हणाले ते खरे आहे. आता विरोधक मोदींपेक्षा अधिक चांगली कामे करण्यासाठी नाही तर घोटाळ्यांसाठी ओळखले जात आहेत. पंतप्रधानपदी मोदीच राहिले तर आपल्यावर कारवाई होईल, सांगाडे बाहेर येतील हे लक्षात आल्याने ते एकत्र आले आहेत. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
राज्यातील भाजप-शिवसेना मंत्र्यांच्या घोटाळ्याची माहिती मी तपास यंत्रणांना दिली आहे. एक लाख कोटींचे घोटाळे आहेत. पंतप्रधान त्यांच्यावर कारवाई करणार का? - खा. संजय राऊत, शिवसेना (ठाकरे) प्रवक्ते