ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - सरकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असला तरी सलग पाच दिवसांचा आठवडा करण्यास महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने विरोध दर्शवला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महासंघाचे अध्यक्ष अ.द. कुलकर्णी यांनी ही भूमिका मांडली.
कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची सुट्टी देताना सलग ६ दिवस कार्यालय सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. कुलकर्णी म्हणाले की, रविवारची सुट्टी कायम राखत सरकारने सोमवार ते शुक्रवार दरम्यान दुसरी साप्ताहिक रजा द्यावी. जेणेकरून नागरिकांना ६ दिवस कार्यालयीन कामे करता येतील. महत्त्वाची बाब म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांवरील कामचोर हा शिक्का पुसून काढण्यासाठी दोन पाळ्यांमध्ये कामकाज सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली. शासन भरती बंद असली तरी कौशल्य विकास योजनेंतर्गत सुशिक्षित तरूणांना मानधनावर कामास घेण्याचा प्रस्तावही महासंघाने मुख्यमंत्र्यांना सुचविला आहे.
कर्माचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 करू नये, अशीही भूमिका महासंघाने मांडली आहे. 50 ते 55 वयापर्यंत पोहचल्यानंतर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी होते. विविध व्याधींनी ते ग्रासतात. त्यामुळे 58 व्या वर्षी निवृत्ती देऊन नवी भरती केल्यास अधिक जोमाने काम होईल. त्यामुळे शासनाने लोकहिताचा विचार करून शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर कराव्यात, असे आवाहन महासंघाने केले आहे.