विशेष प्रतिनिधी/लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संघर्ष यात्रेला अजिबात प्रतिसाद न मिळालेले लोक आता शेतकऱ्यांना संपासाठी चिथावणी देत असून, या संपाला हिंसेचे गालबोट लागावे, असा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री म्हणाले की, संपाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. हा संप स्वयंस्फूर्त नाही. शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे. ज्यांच्या संघर्ष यात्रेला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही ते लोक संपाच्या आड हिंसाचार पसरविण्याचा आणि शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकरी उत्पादकता अधिक असेल तर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींचा फायदा होतो. महाराष्ट्रात उत्पादकता कमी असल्याने या शिफारशींचा किती फायदा होईल, याचा विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांचा पोलिसांशी संघर्ष व्हावा, संपाला गालबोट लागावे, तो चिघळावा असेही प्रयत्न होत आहेत. दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचेच नुकसान आहे. अहमदनगर जिल्ह्यातील काही दूध संघांनी दुधाचे संकलन केले नाही. त्यांना माझे आवाहन आहे की, शेतकऱ्यांकडून २० रुपयांत दूध खरेदी करून मुंबईत ते ७० रुपयांना विकणाऱ्या नेत्यांनी शेतकऱ्यांना अधिकचा भाव द्यावा. संपकरी शेतकऱ्यांशी चर्चेची सरकारची कोणत्याही क्षणी तयारी आहे. आज त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी शासनाने आधीच उपाययोजना हाती घेतलेल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. राजू शेट्टी यांनी संपाला पाठिंबा दिला आहे, याकडे लक्ष वेधले असता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी राजकारण करू नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख या वेळी उपस्थित होते.दुधाचा प्रश्न हा गेल्या १५-२० वर्षांमधील धोरणाचा परिपाक आहे. नेत्यांचे दुधाचे ब्रँड मजबूत झाले आणि सरकारचा ब्रँड कमकुवत करण्यात आला. शेतकऱ्यांची पिळवणूक करून नेत्यांचे दूध संघ तेजीत आले.
संघर्ष यात्रावाल्यांची संपाला चिथावणी
By admin | Published: June 02, 2017 4:10 AM