अतुल कुलकर्णी / मुंबई१९ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, ही विरोधी पक्षाची मागणी सरकारने मान्य केली नाही. त्यामुळे हा प्रश्न थेट जनतेच्या दारात नेण्याचा निर्णय विरोधी पक्षाने घेतला आहे. राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेचे वास्तव जनतेच्या दरबारात मांडण्यासाठी २९ मार्च ते ३ एप्रिल अशी संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे.विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन राज्यभर यात्रा काढणार आहेत. असे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा घडत आहे. मध्यावधी निवडणुकीचे पिल्लू भाजपाने जाणीवपूर्वक सोडले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही आमदार फूटून भाजपात येण्यास तयार असल्याचे सांगत विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा यामागे हेतू आहे. जर विरोधी आमदारांना राजीनामे देऊन त्यांना निवडून आणायचे असेल तर त्या त्या ठिकाणी असणाऱ्या भाजपा सेनेच्या दोन नंबरच्या नेत्यांचे काय? त्यांना कसे गप्प करायचे?, जर विरोधकांनी एकास एक उमेदवार देण्याची भूमिका घेतली आणि त्यातून जर अशा आमदारांचा पराभव झाला तर त्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी होईल त्याचे काय? त्यांचे पुनर्वसन कसे आणि कुठे करणार? असे अनेक प्रश्न आज भाजपाचे आमदार उपस्थित करत होते. भाजपाने शिवसेनेच्या मंत्र्यांना हाताशी धरून सेनेच्या आमदारांना जाणीवपूर्वक वाऱ्यावर सोडले आहे. शिवसेनेचे अस्वस्थ आमदार वेळ पडली तर भाजपात येतील, असा यामागचा डाव असल्याची चर्चा आहे.शुक्रवारी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर सर्व विरोधकांची बैठक झाली. धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, नारायण राणे, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. विधानसभेचे अधिवेशन ७ एप्रिल पर्यंत आहे. त्याआधीच २९ मार्च पासून संघर्ष यात्रा सुरु काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या यात्रेचे नाव आणि मार्ग उद्या निश्चित होणार आहे. पण ही यात्रा चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, अमरावती, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे मार्गे ३ एप्रिलला पनवेलला येईल. तेथे या यात्रेचा समारोप होणार आहे.
विरोधक काढणार संघर्ष यात्रा
By admin | Published: March 25, 2017 12:31 AM