मुंबई : श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे ‘दीपज्योती नमोस्तुते’ हा सोहळा शनिवारी सायंकाळी थाटामाटात रवींद्र नाट्य मंदिरच्या सभागृहात रंगला. या सोहळ््याला विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. या सोहळ््यात प्रथमच अमेरिकेच्या फिलाडेल्फिया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सन्मान करण्यात आला. या सोहळ््याचे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक होते.या सोहळ््यात श्रीसिद्धिविनायक गार्गी पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांना, श्रीसिद्धिविनायक सामाजिक पुरस्कार ‘नाम’ फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांच्या वतीने त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी स्वीकारला. या सोहळ््यात श्रीसिद्धिविनायक वाल्मिकी पुरस्कार कवी अरुण म्हात्रे यांना, श्रीसिद्धिविनायक व्यास पुरस्कार फिलाडेल्फिया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंदार जोगळेकर, श्रीसिद्धिविनायक उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांना, श्रीसिद्धिविनायक सुश्रुत पुरस्कार डॉ.मिलिंद कीर्तने यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तर श्रीसिद्धिविनायक एकलव्य पुरस्कार ललिता बाबर हिच्या वतीने तिची बहीण नकुसा बाबर हिने स्वीकारला. या पुरस्कारांचे स्वरूप स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि ५१ हजार रुपये असे होते. या प्रसंगी न्यास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेंद्र राणे, कोषाध्यक्षा अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर, कार्यकारी अधिकारी संजीव पाटील आणि उपकार्यकारी अधिकारी रवी जाधव यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती. या सोहळ््यात मराठी गीतगायन आणि नृत्याविष्कारांचा रंगतदार कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या कार्याचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली. नाना पाटेकर यांच्या पुरस्काराची रक्कम ‘नाम’ फाउंडेशनला देण्यात येणार असल्याचे मल्हार यांनी या वेळी जाहीर केले. (प्रतिनिधी)
‘दीपज्योती नमोस्तुते’मध्ये रंगला सूर-नृत्याचा संगम
By admin | Published: October 31, 2016 2:16 AM