मुंबई- अवकाशातील घटना या मनुष्यासाठी नेहमीच कुतूहलाच्या असतात. आकाशात सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून पाहण्याचा त्रिवेणी संगम आज जुळून आलाय. 31 जानेवारी 2018 म्हणजेच आज अवकाशात खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून), सुपरमून आणि ब्लुमून पाहायला मिळतोय. चंद्र हा आज पृथ्वीपासून सुमारे 3 लाख 58 हजार किलोमीटर अंतरावर आला आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा 14 टक्के मोठा तर 30 टक्के अधिक तेजस्वी दिसतोय. विशेष म्हणजे उघड्या डोळ्यांनी तुम्हाला चंद्र पाहायला मिळतोय. 31 मार्च 1866 नंतर पहिल्यांदाच म्हणजे तब्बल 152 वर्षांनी असा योग जुळून आलाय. ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो, त्या वेळी त्याला ‘सुपरमून’ म्हणतात. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठं दिसतंय.सुपरमून म्हणजे काय?चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लाख ८४ हजार किलोमिटर इतक्या अंतरावर असतो. पण, चंद्र पृथ्वीभोवती लंबवतुर्ळाकार मार्गाने भ्रमण करीत असल्यामुळे कधी पृथ्वीच्या जवळ (perigee) तर कधी दूर (apogee) जातो. ज्यावेळी पौर्णिमेचा किंवा अमावस्येचा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ अंतरावर येतो तेंव्हा त्या घटनेला सुपरमून असे म्हटले जाते. अशा स्थितीत चंद्र नेहमी पेक्षा मोठा व तेजस्वी दिसतो. वर्षातून काही वेळा सुपरमून घडून येत असते. यापूर्वीचे सुपरमून याच महिन्यात १ तारखेला झाले होते.ब्लुमून म्हणजे काय?सर्व साधारणपणे एका महिन्यात एक पोर्णिमा व एक अमावस्या असते. पण जेंव्हा एकाच महिन्यात दोन पोर्णिमा येतात तेंव्हा त्या दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लुमून असे म्हटले जाते. ब्लुमूनच्या वेळी चंद्र नेहमी सारखाच असतो, त्याचा रंग निळसर वगैरे असा काही नसतो.ब्लड मून म्हणजे काय?सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ज्यावेळी एका सरळ रेषेत आणि प्रतलात येतात त्यावेळी ग्रहण होते. अशा वेळी जेंव्हा चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून (Umbra) जातो तेंव्हा प्रकाश किरणांचे विकीरण होते व बहुतांश निळ्या रंगाच्या छटा शोषल्या जावून नारंगी लाल रंग तेवढाच शिल्लक राहतो. यामुळे चंद्र गडद छायेत असताना म्हणजे खग्रास स्थितीत असताना लालसर नारंगी दिसतो.