मुंबई : मोबाइल टॉवरसाठी खासगी इमारती लाखो रुपयांचे भाडे आकारत असताना, मुंबईतील पालिका आणि शासकीय इमारतीवर उभारण्यात येणाऱ्या टॉवरसाठी फक्त १ रुपया प्रति चौरसमीटर इतके नाममात्र भाडे आकारण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने तयार केला आहे. या सर्व प्रकारांत तब्बल १ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, विरोधकांनी विधान परिषदेत सभात्याग केला. राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. महापालिकेच्या मालकीच्या इमारतीवर मोबाइल टॉवर उभारण्यास परवानगी देताना, केवळ १ रुपया भाडे आकारण्याचा प्रस्ताव सुधार समितीने २०१२ साली घेतल्याची बाब नार्वेकर यांनी सरकारच्या निदर्शनास आणली. मुंबईतील खासगी इमारतीवरील टॉवरसाठी २५ ते ३० लाखांचे भाडे आकारले जाते. पालिकेने मोबाइल कंपनीवर मेहरनजर करण्यासाठी असे धोरण आखल्याची टीका त्यांनी केली. प्रकाश बिनसाळे आणि किरण पावसकर यांनीदेखील हा मुद्दा उचलून धरला. यावर संबंधित निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याचे स्पष्टीकरण नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले. पाटील यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने, विरोधी सदस्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत सभात्याग केला. (प्रतिनिधी)
मोबाइल टॉवरवरून विरोधकांचा सभात्याग
By admin | Published: April 07, 2016 2:46 AM