पुणे : सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)तर्फे २२ जानेवारी रोजी पुण्यासह देशभरातील परीक्षा केंद्रांवर नेट परीक्षा घेतली जाणार आहे. परंतु, काही विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांना लुल्लानगर येथील केंद्राऐवजी आता पिंपरी-चिंचवड येथील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.सीबीएसईतर्फे देशभरातील विद्यार्थ्यांकडून १७ आॅक्टोबर ते २३ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत नेट परीक्षेचे आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) २८ डिसेंबर २०१६ रोजी सीबीएसईच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र काढून घेण्याबाबतचा एसएमएस मोबाईलवर पाठविण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट काढले तेव्हा त्यांना लुल्लानगर येथील परीक्षा केंद्र देण्यात आले होते. तसेच त्यावर अर्धवट पत्ता छापला गेला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते; परंतु काही दिवसांनी पुन्हा हॉल तिकीट डाउनलोड केले तेव्हा पिंपरी-चिंचवड येथील परीक्षा केंद्र दिल्याचे दिसून आले. त्यामुळे परीक्षेला जाण्यापूर्वी सर्वांनी पुन्हा एकदा परीक्षा केंद्र तपासून घ्यावे, असे अवाहन केले जात आहे. (प्रतिनिधी)लक्ष्मण पवार या विद्यार्थ्याने सांगितले, की परीक्षा केंद्र बदलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. काही विद्यार्थी हॉल तिकीट काढून गावी गेले आहेत. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलल्याचे माहीत नाही. मी माझ्या मित्रांना सांगितले तेव्हा त्यांना विश्वास बसला नव्हता. परंतु, दुसऱ्यांदा हॉल तिकीट डाउनलोड केले तेव्हा त्यांची खात्री पटली.जोत्स्ना खंडागळे हिने सांगितले, की हॉल तिकीट काढून घेण्याबाबत मला एकदाच एसएमएस आला होता. त्या वेळी लुल्लानगर येथील केंद्राचा अपूर्ण पत्ता होता. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी कोणत्या केंद्रावर जावे, असा प्रश्न आम्हा विद्यार्थ्यांसमोर पडला होता. परंतु, पाच-सहा दिवसांपूर्वी पुन्हा हॉल तिकीट काढून घेतले, त्या वेळी पिंपरी-चिंचवड येथील जी.जी. इंटरनॅशनल हे परीक्षा केंद्र दिल्याचे दिसून आले. ज्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांना हॉल तिकीट पाहिलेले नाही, त्यांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे.
नेट परीक्षा केंद्र बदलल्याने गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2017 12:32 AM