ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १२ - अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सभेत सोमवारी प्रचंड गोंधळ झाला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. तीन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यास कांही सभासदांचा विरोध होता. त्यातून हा गोंधळ झाला.
अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले होते. येथील राम गणेश गडकरी सभागृहात सुमारे तीन तास वादळी चर्चा झाली. अखेरीस स्विकृत सदस्यांचा ठराव बारगळला. मुंबईसाठी स्वतंत्र उपाध्यक्ष नेमण्यास एकमताने मंजूरी देण्यात आली.
महामंडळाची घटना दुरुस्तीसाठी ही सभा बोलविण्यात आली होती. सुरेंद्र पन्हाळकर यांचे सभासदत्व निलंबित केले आहे, त्यांना सभेत प्रवेशच देवू नये यावरून वाद सुरु झाला. उपाध्यक्ष दोन नकोत यावरून ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर व रवि गावडे यांच्यात चांगलीच जुंपली. भालकर यांचा दोन उपाध्यक्ष हवेत असा आग्रह होता. तर गावडे यांना ते मान्य नव्हते.
एकच उपाध्यक्ष सक्षम आहे असे त्यांचे म्हणणे होते. स्विकृत सदस्य घ्यायचा असेल तर सर्वसाधारण सभा ज्याला मंजूरी देईल अशाच लोकांना घ्या, मागील दाराने परवानगी दिली जाणार नाही असे सभासदांनी सांगितले. त्यामुळे हा ठराव बारगळला.