पुणे : इंडियन केटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ने चहा, नाश्ता, जेवणाच्या दरवाढीवरून प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नवीन दरांची अंमलबजावणी दि. १८ नोव्हेंबरपासून बहुतेक सर्व एक्सप्रेस गाड्यांमध्ये सुरू असल्याचे ‘आयआरसीटीसी’च्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. तर रेल्वेने मात्र ही दरवाढ २८ मार्च २०२० पासून लागू होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या दरवाढीबाबत रेल्वे आणि ‘आयआरसीटीसी’मध्येच एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘आयआरसीटीसी’ने शताब्दी, दुरांतोसह सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांमधील खानपानाचे दर वाढविण्यात आले आहेत. दि. १८ नोव्हेंबरपासून मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये वाढीव दराने चहा, नाश्ता, जेवण देण्यास सुरूवात झाली आहे. तर शताब्दी, दुरांतो व राजधानी या गाड्यांमध्ये दि. २९ मार्च २०२० पासून वाढीव दरवाढ लागू होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने दि. १५ नोव्हेंबरच्या प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट केले आहे. मात्र मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने नवीन दरवाढीची अंमलबजावणी दि. २८ मार्च २०२० पासून होणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे. त्यामुळे दरवाढीच्या अंमलबजावणीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनाही याबाबतचे स्पष्टीकरण देता आले आहे. त्यांनी ‘आयआरसीटीसी’च्या अधिकाºयांशी संपर्क साधण्यास सांगितले. ‘आयआरसीटीसी’च्या अधिकाºयांनी मात्र मेल व एक्सप्रेस गाड्यांमध्ये दरवाढ लागू झाली असल्याचे स्पष्ट केले.मध्य रेल्वेचा जनसंपर्क विभाग व आयआरसीटीसी अधिकाºयांच्या माहितीमध्ये तफावत असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वेगाड्यांमध्ये वाढीव दराप्रमाणे प्रवाशांना अन्नपदार्थ घ्यावे लागत आहेत. मग रेल्वेच्या प्रसिध्दीपत्रकाचे काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. नवीन दरवाढ पॅन्टी कार व डायनिंग कार असलेल्या गाड्यांसाठी आहे. राजधानी, शताब्दी, दुरांतो गाड्यांमधील प्रथम श्रेणी वातानुकूलित आणि एक्झिक्युटिव चेअर डब्यांमधे सकाळचा चहा १५ रुपयांऐवजी आता ३५ रुपयांना आणि एसी २, एसी ३ व चेअर कार डब्यांमध्ये १० रुपयाऐवजी २० रुपयांना मिळेल. दुरांतो एक्सप्रेसमधील शयनयान डब्यांमध्ये हा चहा १० रुपयांऐवजी १५ रुपयांना मिळेल. मेल, एक्सप्रेस गाड्यांमधील चहाच्या दरात बदल करण्यात आलेला नाही. नाश्ता व शाकाहारी जेवणाचे दर अनुक्रमे १० व ३० रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. आता प्रवाशांना अनुक्रमे ४० व ८० रुपये मोजावे लागत आहेत. ------------
मेल, एक्सप्रेस गाड्यांमधील सुधारीत दर (कंसात पुर्वीचे)- नाश्ता (शाकाहारी) - ४० रुपये (३० रुपये) जेवण (शाकाहारी) - ८० रुपये (५० रुपये) -----------------संकेतस्थळावर मेनु कार्ड जुनेच‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर मेनु कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे. एक्सप्रेस, राजधानी, दुरांतो, शताब्दी गाड्यांमधील नाश्ता जेवणातील मेनु व त्याचे दरही देण्यात आले आहेत. मात्र, या दरांमध्ये नवीन बदलानुसार कसलाही बदल केलेला नाही. त्यामुळेही प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एक्सप्रेस गाड्यांमध्ये नाश्ता, जेवणासाठी वाढीव दर घेतल्यास प्रवाशांकडून संकेतस्थळावरील मेनुकार्ड दाखविले जात आहे. त्यामुळे काहीवेळा वादही होत आहेत. तर काही गाड्यांमध्ये नवीन दराप्रमाणे मेनुकार्डही उपलब्ध करून दिले जात नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी टिष्ट्वटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. ‘आयआरसीटीसी’कडून लवकरच मेनुकार्ड अद्ययावत करण्यात येईल, असे उत्तर दिले जात आहे.सर्व एक्सप्रेस गाड्यांमध्ये नवीन दराप्रमाणे अन्नपदार्थ विक्री करण्यास सुरूवात झाली आहे. दुरांतो, राजधानी, शताब्दी या गाड्यांसाठी अद्याप दरवाढ लागू नाही. - गुरूराज सोना, सहायक व्यवस्थापक, आयआरसीटीसी, पुणे--------------