मयुर गोलेच्छा/लोणार (बुलडाणा):जून २0१४ मध्ये लोणार येथील खार्या पाण्याच्या सरोवरास आंतरराष्ट्रीय पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते; मात्र हा दर्जा देणार्या रामसर साईटच्या अधिकृत संकेत स्थळावर पाणथळ क्षेत्र असलेल्या देशातील स्थळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यामध्ये लोणारच्या खार्या पाण्याच्या वैशिष्टपूर्ण सरोवराचे नावच नसल्याने लोणार सरोवराला आंतरराष्ट्रीय पाणथळ क्षेत्राचा दर्जाच मिळाला नसल्याचे स्पष्ट होत आहे.जलीय परिसंस्था व जमिनीवरील परिसंस्था (भूपरिसंस्था) या दोन्हीचेही गुणधर्म असलेल्या स्थळास रामसर साईटच्यावतीने जागतिक पाणथळ स्थळाचा दर्जा बहाल करण्यात येतो. जून २0१४ मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडलेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत राज्यातील जायकवाडी, नांदुर मधमेश्वर आणि लोणार सरोवरास आंतरराष्ट्रीय पाणथळ क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले होते. या बैठकीस राज्याचे तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम, वन विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव प्रविण परदेशीसह विविध अधिकारीही उपस्थित होते. लोणार सरोवर हे राज्यातील पहिलेच आंतरराष्ट्रीय पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित झाल्याने पर्यटनवाढीस चालना मिळणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावेळी सांगितले होते. प्रत्यक्षात लोणार सरोवर विकासाच्या बाबतीत प्रशासनाकडून केवळ बडेजावपणा मिरविण्यात येत असून, खरी परिस्थिती काय ती कळायला मार्ग नाही. वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या लोणार सरोवराने जागतिक पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र शासनस्तरावर हा मुद्दा गांभीर्याने घेण्यात आला नाही. आतापर्यंत देशातील २६ स्थळांना पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील एकाही पाणथळ स्थळाचा समावेश नसल्याचे रामसर साईटने प्रसिद्ध केलेल्या यादीवरुन स्पष्ट होत आहे.याप्रकरणी लोणार येथील सरोवर तज्ज्ञ प्रा.सुधाकर बुगदाणे यांनी रामसर साईटच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये लोणारचा समावेशच नसल्याने शासनाचा खोटारडेपणा उघडकीस आल्याचे सांगुन प्रत्यक्षात याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला होता किंवा नाही, याची चौकशी राज्य सरकारने करण्याचे अवाहन करण्याची मागणी केली आहे.
लोणारच्या पाणथळ स्थळाचा दर्जावर संभ्रम
By admin | Published: January 28, 2015 11:28 PM