सांगलीच्या उमेदवारीवरून संभ्रम; तीन नावांच्या शिफारसीने गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 05:19 AM2019-01-31T05:19:05+5:302019-01-31T05:22:46+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण, सर्वांना उत्सुकता
सांगली : राज्यातील अन्य जागांपेक्षा सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये कमालीचा संभ्रम दिसत आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांचे निधन झाल्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव व आपसात मतभेद असल्याने उमेदवारीबाबत निर्णय कसा घ्यायचा, असा प्रश्न पडला आहे. जिल्ह्यातून तीन नावांची शिफारस झाल्याने गोंधळ अधिक वाढला आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील या दोघांच्या नावांची शिफारस प्रदेश पार्लमेंटरी बोर्डाकडे करण्यात आली आहे. असे असताना निवडणूक लढविण्यास इच्छुक नसलेले आ. विश्वजित कदम यांच्यासह अन्य काही नावे दिल्लीला पाठविण्यात येणार असल्याचे समजते. विश्वजीत कदम यांनी स्पष्टपणे लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतरही त्यांना लढविण्याबाबत आग्रह धरला जात आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचीही मध्यंतरी चर्चा सुरू होती, मात्र त्यांनीही चर्चेला नकार देत पूर्णविराम दिल्याने दोन इच्छुकांशिवाय कोणताही पर्याय पार्लमेंटरी बोर्डासमोर नाही. तरीसुद्धा संबंधित नावांचे पर्याय सुचविले जात आहेत. प्रत्येक जागेसाठी सक्षम उमेदवार निवडून ताकद लावण्याची तयारी कॉँग्रेसमार्फत करण्यात येत आहे. तरीही सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून सर्वाधिक संभ्रम पार्लमेंटरी बोर्डासमोर दिसत आहे.