राजेश निस्ताने, यवतमाळउपअधीक्षक पदावर बढती देण्यासाठी जारी निवड सूचीमध्ये प्रचंड गोंधळ आढळून आला आहे. चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या निरीक्षकाचा या यादीत समावेश केला गेला. तर जातवैधता प्रमाणपत्र नसतानाही अनेकांना पदोन्नतीसाठी पात्र ठरविले गेल्याने पोलीस महासंचालक कार्यालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राज्यातील ३१९ पोलीस निरीक्षकांची पदोन्नती निवड सूची पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांच्या स्वाक्षरीने बुधवारी जारी केली गेली. परंतु या यादीत अनेक घोळ असल्याची गंभीर बाब पुढे आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ट्रॅपमुळे निलंबित झालेल्या निरीक्षकाचाही या यादीत समावेश आहे. ग्रेडेशन लिस्टमध्ये वरिष्ठ निरीक्षकांची नावे खाली आणि कनिष्ठांची नावे अग्रणी असल्याचा प्रकारही निदर्शनास आला. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश झुगारून जातवैधता प्रमाणपत्राशिवाय सर्रास बढत्या देण्याची तयारी कार्यालयामार्फत सुरू आहे.
पोलीस पदोन्नती सूचीत गोंधळ
By admin | Published: March 12, 2016 4:08 AM