नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांमध्ये झालेल्या गोंधळाची जबाबदारी घेण्यास मनपा प्रशासन तयार नाही, याउलट या गोंधळाला मतदारच जबाबदार असून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात योग्य त्या सुधारणा- दुरुस्त्या करून घेण्याची जबाबदारी मतदारांची होती, असा पवित्रा मनपा प्रशासनाने घेतला आहे. महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान घेण्यात आले. यंदा मतांचा टक्का वाढून मतदान विक्रमी ६२ टक्के नोंदविले गेले असले तरी जवळपास सर्वच प्रभागांमध्ये मतदार याद्यांमधील गोंधळाचा फटका शेकडो मतदारांना बसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. असंख्य मतदारांना त्यांची नावे मतदार यादीत शोधूनही सापडली नाहीत, तर शेकडो मतदारांचे वास्तव्य एका प्रभागात तर मतदान दुसऱ्या प्रभागात, अशी स्थिती निदर्शनास आली. एकाच कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मतदान करावे लागले, तर अनेकांना नेहमीच्या मतदान केंद्रांऐवजी दूर अंतरावर पायपीट करत मतदानासाठी जावे लागले. मतदार यादीत नावे गायब झाल्याने पंचवटीतील म्हसरूळ याठिकाणी मतदारांकडून रास्ता रोकोचा प्रयत्न झाला, तर नाशिकरोड विभागातही मतदार यादीवरून गोंधळ उडाला. या साऱ्या गोंधळाबाबत महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अभिषेक कृष्ण यांनी मात्र, मतदारांनाच जबाबदार धरले आहे. ज्या मतदारांची तक्रार आहे त्यांनी तशी लेखी तक्रार करावी. वास्तविक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर रीतसर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्याचवेळी मतदारांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही, याची खात्री करून घेणे आवश्यक होते. त्यावेळी प्राप्त ६५० हरकतींवर कार्यवाही करत प्रशासनाने त्या निकालीही काढल्या होत्या. मात्र, स्वत: जागृत न राहता ऐन मतदानाच्या वेळी ओरड करणे उचित नसल्याचेही आयुक्तांनी सांगितले. उलट मतांचा टक्का वाढावा यासाठी महापालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आली आहे. त्यातूनच मतदानाची काही प्रमाणात टक्केवारी वाढण्यास मदत झाल्याचा दावाही त्यांनी केला.
महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांमध्ये गोंधळ
By admin | Published: February 22, 2017 6:06 PM