लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेनंतर सैरभैर झालेल्या कॉँग्रेसला गावोगावी असलेल्या कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या ताकदीने टिकवून ठेवले. अनेक तालुक्यांत कॉँग्रेसने समर्थ पर्यायही उभे करण्याचा प्रयत्न केला. पण हर्षवर्धन पाटील, अनंतराव थोपटे यांच्यासारखे दिग्गज माजी मंत्री असतानाही जिल्हा पातळीवर कॉँग्रेसला बांधून ठेवणारे नेतृत्व मिळाले नाही. जिंकण्याच्या उमेदीने ‘चार्ज’ करणारा नेताच मिळाला नसल्याने पुणे जिल्ह्यात कॉँग्रेसला घरघर लागली आहे.१९९९ मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना झाली. या वेळी तत्कालिन कॉँग्रेसमधील सगळी दिग्गज मंडळी राष्ट्रवादीत दाखल झाली. खुद्द शरद पवारांचा जिल्हा असूनही त्यानंतरच्या निवडणुकांत कॉँग्रेसने राष्ट्रवादीला चांगली टक्कर दिली. मात्र, नंतरच्या काळात नेत्यांनी स्वत:च्या पायापुरते पाहत संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला नाही. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, भोरमध्ये अनंतराव थोपटे आणि पुरंदरमध्ये चंदुकाका जगताप यांनी आपापली ‘पॉकटेस’ सांभाळण्याकडेच लक्ष दिले. त्यामुळे इतर तालुक्यातील कॉँग्रेसला वालीच राहिला नाही.जिल्हा पातळीवरीलच नव्हे तर राज्य पातळीवरील नेतृत्वानेही पुणे जिल्ह्याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे आघाडी सरकारच्या तब्बल १५ वर्षांच्या काळात जिल्ह्यात कॉँग्रेस वाढलीच नाही. नाही म्हणायला विलासराव देशमुख, नारायण राणे यांनी काहीसे प्रयत्न केले. दौंडमध्ये रमेश थोरात यांच्यासारख्या नेत्यासाठी विलासराव देशमुख यांची सभा झाली होती. या वेळी कॉँग्रेस कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायावर त्यांनी ‘दौंड पोलीस ठाण्याचा लिलाव झाला आहे का?’ असा सवाल त्यांनी केला होता. नारायण राणे यांनीही मध्यंतरीच्या काळात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. हर्षवर्धन पाटील अधून-मधून अचानक जिल्हा कॉाग्रेसमध्ये सक्रीय होत होते. परंतु, पुणे जिल्हा राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचा असल्याने राज्य पातळीवरील समीकरणात कॉग्रेस नेत्यांकडूनच पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे बळी दिले गेले. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची संगत केल्याशिवाय पर्याय राहिला नाही. शिरूरमध्ये बाबूराव पाचर्णे यांच्या रुपाने पक्षाची चांगली ताकद असताना त्यांना शेवटी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा लागला. दुसऱ्या बाजुला स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांत कॉँग्रेस चांगली कामगिरी करत असताना विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात मात्र कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. केवळ भोर आणि पुरंदर या दोन जागाच कॉँग्रेसच्या वाट्याला आली. साहजिकच इतर तालुक्यांत पक्षाच्या वाढीला मर्यादा आल्या. त्यामुळेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकांत अचानक स्वबळावर लढण्याची वेळ आल्यावर अनेक ठिकाणी कॉँग्रेसला उमेदवारही मिळाले नाहीत.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी वरिष्ठ नेतेच जवळीक साधत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच संभ्रमाचे वातावरण राहिले. त्यामुळे पवारविरोधाची ‘स्पेस’ शिवसेना- भाजपाने भरून काढली. बहुतांश तालुक्यात शिवसेना-भाजपामध्ये आज दिसणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये ‘पवारविरो’’ हे समान सूत्र आहे. पण,यातून कॉँग्रेसच्या हाताशी काहीच लागले नाही. उलट पक्षाचे कार्यकर्ते पक्ष सोडून गेले. काही जहागिऱ्या केवळ टिकून राहिल्या. त्यांनीही आपल्या सोईचे राजकारण करताना इतर तालुक्यांना वाऱ्यावर सोडले.युवक कॉँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने आपली खंत व्यक्त करताना नेमके यावरच बोट ठेवले. त्याच्या म्हणण्यानुसार, भाजपाने व्यक्तिगत संबंध बाजूला ठेवून पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न केला; तसे काँग्रेसच्या नेत्यांनी केले नाही. पदाधिकाऱ्यांना आर्थिक ताकद तोकडी पडते.बारामतीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर म्हणाले, कार्यकारिणीच्या निवडी आता होणार आहेत. वीरधवल गाडे युवक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.>तालुक्याचे नेतृत्व देण्यात कमी : संजय जगतापकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप म्हणाले, ‘‘निवडणुकांत टिकून राहणे म्हणजेच पक्ष जिवंत राहणे असे नव्हे. बारामती व आंबेगाव या तालुक्यांत आम्ही कमी आहोत. तरी आमचे ग्रामीण भागात संघटन मजबूत आहे. १८ ब्लॉक असून आमचे ३८ हजार क्रियाशील सभासद आहेत. प्रश्न आहे तो तालुक्याच्या सक्षम नेतृत्वाचा. लोकांना आश्वासक वाटावे, असे तालुक्याचे नेतृत्व देण्यात कमी पडलो आहोत. हर्षवर्धन पाटील, संग्राम थोपटे व इतर पदाधिकाऱ्यांबरोबर नुकतीच एक बैैठक होऊन याबाबतचे धोरण ठरविण्यात आले आहे.
जिल्ह्यात कॉँग्रेसला हवाय ‘चार्जर’
By admin | Published: July 12, 2017 1:19 AM