पुणे : भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुण्यातील मुख्यालय असलेल्या मोतीबागेला भेट दिली. पक्षसंघटनेच्या वतीने ही भेट ठरवण्यात आली होती. संघाचे महानगर कार्यवाह रवींद्र वांझरगावकर यांनी त्यांना संघकार्याची माहिती दिली.भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले तसेच निवडून आलेले बहुसंख्य नगरसेवक, नगरसेविका या वेळी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीत भाजपाला प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले आहे, त्याचबरोबर ९८ इतक्या मोठ्या सदस्यसंख्येने नगरसेवक निवडून आले आहेत. या नगरसेवकांमध्ये मूळ भाजपाचे नसलेले अनेक नगरसेवक आहेत. त्यांना भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख व्हावी, या हेतूने जाणीवपूर्वक ही भेट ठरवण्यात आली होती. पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली. शहराध्यक्ष गोगावले यांनी सांगितले, की संघाच्या मुशीतूनच भाजपा घडला आहे. ज्या पक्षाचे आपण प्रतिनिधित्व करतो, त्या पक्षाची मूळ शाखा माहिती असणे गरजेचे आहे. संघाचा म्हणून एक वेगळा त्यागाचा, देशभक्तीचा संस्कार आहे. तो सर्वांवर व्हावा, त्याची ओळख व्हावी तसेच संघाच्या पदाधिकाऱ्यांनाही नगरसेवकांची माहिती व्हावी, यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती. संघाच्या महानगर कार्यवाहांनी सर्व नगरसेवकांना संघाची थोडक्यात ओळख करून दिली. संघाच्या वनवासी कल्याण आश्रम तसेच अन्य उपक्रमांची माहितीही त्यांना देण्यात आली.(प्रतिनिधी) >गोगावले म्हणाले, की पक्षात अन्य पक्षीय नगरसेवकही आले आहेत. ते आता भाजपाचे झाले आहेत. त्यामुळे त्यांना ही ओळख करून देणे गरजेचे होते. आता पक्षाच्या वतीने या नगरसेवकांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाची माहितीही करून देण्यात येणार आहे. त्यासाठीचे कायदे, सभागृहात बोलायचे कसे, विषय कसे मांडायचे, कामकाजात सहभाग कसा घ्यायचा याविषयी प्रबोधिनीत मार्गदर्शन केले जाईल. लवकरच त्याचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती गोगावले यांनी दिली.
भाजपा नगरसेवकांवर संघसंस्कार
By admin | Published: March 04, 2017 12:50 AM